विदर्भातही तीव्र पडसाद

By admin | Published: June 2, 2017 01:13 AM2017-06-02T01:13:30+5:302017-06-02T01:13:30+5:30

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचे पडसाद अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात उमटले असून अमरावतीत

Vidarbha too severe depression | विदर्भातही तीव्र पडसाद

विदर्भातही तीव्र पडसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचे पडसाद  अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात उमटले असून अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गुरुवारी दुपारी २ वाजता कांदे, भाजीपाला आणि दूध रस्त्यावर
फेकून शेतकऱ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.
यवतमाळ जिल्ह्यात विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील शेंबाळपिंपरीत शेतकऱ्यांनी रस्त्यावर १०० ते १५० लीटर दूध ओतून शासनाविरुद्ध रोष व्यक्त केला. तर वर्धेतील दूध उत्पादकांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत तब्बल १५५ लीटर दूध फेकले. यवतमाळात जिल्हा काँग्रेस कमिटीने शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून वणी आणि घाटंजी येथे शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. यवतमाळ शहरात मात्र या संपाचे कोणतेही पडसाद
उमटले नाहीत. भाजीबाजारासह शेतकऱ्यांशी संबंधित सर्व व्यवहार सुरळीत होते.
वर्धेलगतच्या भुगाव, तळेगाव (टा.), येथील शेतकऱ्यांचा या आंदोलनात सहभाग होता. आंदोलनानंतर दूध उत्पादकांनी विविध मागण्यांचे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. तर भाजी बाजारात स्थिती सर्वसामान्य होती. याव्यतिरिक्त हिंगणघाट येथे शेतकरी संघटना व किसान क्रांतीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. आष्टी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात वाकोडी या गावात धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांनी आपणही आंदोलनात मागे नसल्याचे दाखवून दिले.
पाटणसावंगी येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकोडी या गावात शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वाकोडी या गावातील आशिष राऊत हे दुधाचा व्यवसाय करतात. आंदोलनादरम्यान त्यांनी दुधाचे कॅन आंदोलन स्थळी जमिनीवर टाकून यापुढे आपण शहराला दूधपुरवठा करणार नाही, असा संकल्प केला.
शिवसेनाप्रणीत किसान सेनेच्या वतीने सकाळी बुलडाण्यातील स्टेट बँक चौकात रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांच्या संपाला समर्थन देण्यात आले. शिवसेनेचे नेते खासदार तथा संपर्कप्रमुख प्रताराव जाधव यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन रस्त्यावर दूध ओतून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. बुलडाणा शहर पोलिसांनी काही काळासाठी आंदोलकांना ताब्यात घेतले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बुलडाणा जिल्हा काँग्रेस समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे.

पश्चिम वऱ्हाडात प्रतिसाद
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील बाग फाटा येथे शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून संपात सहभाग घेतला. अकोला व अकोट शहरात उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
भाजीपाल्याची रात्री खरेदी करण्यात आलेली असल्याने पहिल्या दिवशी या संपाचा परिणाम जाणवला नाही. वाशिम जिल्ह्यातील गट ग्रामपंचायत टनका येथील शेतकऱ्यांनी १ जूनपासून बेमुदत संप पुकारला असून गावातील मंदिरासमोर ठिय्या दिला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्यशासन गंभीर नसल्याचा आरोप करीत, शेतकऱ्यांनी शहरात दैनंदिन येणारे शेकडो लीटर दुध गुरुवारी गावातच वाटले. शासन जोपर्यंत मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत संप कायम राहील, असा निर्धार गावकऱ्यांनी बोलून दाखविला आहे.

प्रफुल्ल पटेल यांना अटक
गोंदिया : शेतकरी कर्जमाफी यासह नागरी समस्यांबाबत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जयस्तंभ चौकात रास्ता रोको आंदोलनही केले. रास्ता रोको आंदोलन मागे न घेतल्याने खा. पटेल यांच्यासह आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर सुटका करण्यात आली.

Web Title: Vidarbha too severe depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.