विदर्भातील सफेद मुसळी, अश्वगंधा लागवडीवर भर!
By Admin | Published: March 7, 2017 02:32 AM2017-03-07T02:32:56+5:302017-03-07T02:32:56+5:30
केंद्र शासनाची योजना, फलोत्पादन औषध वनस्पती मंडळाचे अर्थसहाय्य.
अकोला, दि. ६- पारंपरिक शेतीसोबतच अधिक उत्पादन व उत्पन्न देणार्या पिकांकडे शेतकर्यांचा कल वाढला असून, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेही शेतकर्यांना औषध वनस्पती व इतर पर्यायी पिके घेण्यासाठीचे प्रबोधन सुरू केले आहे. सफेद मुसळी आणि अश्वगंधा यासारख्या औषध पिकांची वाढती मागणी बघता, कृषी विद्यापीठाच्यावतीने ही पिके घेण्यासाठी विदर्भातील शेतकर्यांना प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिक व तंत्रज्ञान समजावून सांगितले जात आहे.
केंद्र शासनाने ३६५ दिवस औषध वनस्पती प्रचार व प्रसार करण्यासाठी चालू वर्षात योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषध वनस्पती मंडळाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जून वनौषध उद्यान विभागाला अर्थसहाय्य उपलब्ध केले आहे. याच अर्थसहाय्यातून शेतकर्यांना वनौषधीचे प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिक व तंत्रज्ञान समजावून सांगितले जात आहे.
विदर्भातील अकोलासह इतर जिल्हय़ात हे तंत्रज्ञान समजावून सांगितले जात असून, अकोला जिल्हय़ातील अकोट तालुक्यातील बोर्डी येथील शेतकरी संजय धर्मे यांनी तूर या पिकात सफेद मुसळीचे आंतरपीक घेतले आहे. सफेद मुसळीचे कंद जमिनीतून काढून त्यावर करावयाच्या प्राथमिक प्रक्रियाचे प्रात्यक्षिक शेतकर्यांना दाखवण्यात आले. तज्ज्ञांनी शेतकर्यांना पेरणीचे तंत्रज्ञान समजावून सांगितले आहे. गडचिरोली जिल्हय़ातील साखरा येथील शेतकर्यांना अश्वगंधा लागवडीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. नामदेव उंदिरवाडे यांच्या शेतातील अश्वगंधाच्या मुळा जमिनीतून काढून त्यावर करावयाच्या प्रक्रियांचे प्रात्यक्षिक शेतकर्यांना समजावून सांगण्यात आले.
नागार्जून वनौषध वनस्पती उद्यानात साडेपाचशेच्यावर औषध वनस्पतीच्या रोपांचे जतन करण्यात आले आहे. येथेही शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. सुगंधी वनौषध तसेच तिखाडी तेल निर्मितीचे प्रात्यक्षिक येथे दाखविण्यात येत आहे. शेतकर्यांनी प्रशिक्षण घेऊन तिखाडी प्रकल्प सुरू केला आहे.
- विदर्भातील शेतकर्यांना तिखाडी तेल, अश्वगंधासह इतर औषध वनस्पतीचे तंत्रज्ञान समजावून सांगितले जात आहे. येथून प्रशिक्षण, माहिती घेऊन शेतकर्यांनी तिखाडी तेलाचा प्रकल्प सुरू केला आहे.
- डॉ. संजय वानखडे,
सहयोगी संशोधन संचालक,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.