विदर्भात पांढ-या सोन्याचे उत्पादन घटणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2016 12:19 AM2016-09-14T00:19:37+5:302016-09-14T00:19:37+5:30
कमी पाऊस, बोंडअळी, लाल्याचे आक्रमण.
अकोला, दि. १३ : अगोदरच विदर्भात पांढर्या सोन्याचे (कापूस) पेरणी क्षेत्र घटले आहे. त्यात पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने जमीन भेगाळली असून, विविध रोगांसह या पिकावर लाल्याने आक्रमण केले. हा प्रादुर्भाव अधिक वाढल्यास जवळपास ६0 टक्के कापसाचे नुकसान होण्याची शक्यता असते, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
कापूस हे विदर्भाचे नगदी पीक; परंतु उत्पादनावर आधारित दर मिळत नसल्याने अलीकडच्या दहा वर्षांत हे पीक मागे पडले असून, याची जागा सोयाबीनने घेतली आहे. विदर्भात हे पीक १८ ते २0 लाख हेक्टरच्या वर पेरल्या जात होते; परंतु सद्यस्थितीत कापसाची पेरणी केवळ ८ लाख हेक्टरवर झाली आहे. यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या; पण हे पीक वाढीच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारली आहे. सहा आठवडे झाले पाऊस नसल्याने सोयाबीन अनेक ठिकाणी करपले आहे. कापूस पिकावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. या पिकावर बोंडअळी, तुडतुडे व लाल्या या रोगाचा विपरीत परिणाम झाला आहे. जमीन भेगाळल्याने कापसाची पाने लाल होऊन करपत चालली आहेत.
-सर्वच पिकांच्या नुकसानाची शक्यता
पावसाने दडी मारल्याने मूग, उडिदाचे नुकसान झाले असून, पश्चिम विदर्भातील साडेचार हेक्टरवरील तूर पीक धोक्यात आले आहे. यातील काही पिकांचे नुकसानदेखील झाले आहे. सोयाबीन तग धरू न होते; परंतु पाऊसच नसल्याने हजारो हेक्टर पीक करपले आहे.
एकतर पाऊस नाही त्यात लाल्या आला आहे. कापूस फुलोर्यावर येत असताना लाल पाने झाली, तर उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यावेळी दुर्लक्ष केल्यास निकृष्ट दर्जाची रुई, बोंडे अपूर्ण उघडतात व बोंडांचे वजन कमी होत असल्याने शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. यामुळे उत्पादनात १0 ते ६0 टक्के एवढी घट आढळून आल्याचा निष्कर्ष वनस्पती रोग शास्त्रज्ञांनी काढलेला आहे.
- डॉ. राजेंद्र गाडे,
वनस्पती रोग शास्त्रज्ञ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.