‘वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी’च्या निकषात विदर्भ नापास! पुणे विद्यापीठाची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 05:28 PM2017-10-25T17:28:36+5:302017-10-25T17:28:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जागतिक दर्जाचे २० विद्यापीठ बनविण्याची घोषणा यापूर्वी केली आहे. मात्र, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विदर्भातील आठपैकी एकाही विद्यापीठाकडून याबाबत प्रस्ताव मागविला नाही. त्यामुळे केंद्राच्या...
- गणेश वासनिक
अमरावती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जागतिक दर्जाचे २० विद्यापीठ बनविण्याची घोषणा यापूर्वी केली आहे. मात्र, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विदर्भातील आठपैकी एकाही विद्यापीठाकडून याबाबत प्रस्ताव मागविला नाही. त्यामुळे केंद्राच्या लेखी विदर्भातील ‘युनिव्हर्सिटी’ नापास आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे.
विदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ, नागपूरचे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस अँड युनिव्हर्सिटी आणि अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अशी एकूण नऊ विद्यापीठे आहेत. केंद्र सरकार देशातील १० शासकीय व १० खासगी अशा २० विद्यापीठांना जागतिक दर्जाचे बनविणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. या विद्यापीठांना १० हजार कोटींचे अनुदान केंद्र सरकारतर्फे मिळणार आहे. त्यासाठी विद्यापीठांकडून १२ डिसेंबरपूर्वी प्रस्ताव मागविले आहेत. राज्यातून पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने या यादीत स्थान मिळविण्यासाठी विशेष तयारी केली असून, या प्रक्रियेत बुधवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे केंद्राशी संवाद साधल्याची माहिती कुलसचिव ए.डी. शाळीग्राम यांनी दिली. विद्यापीठाने इंटर्नल क्वॉलिटी अॅसेसमेंट सेल (आयक्यूएसी) च्या माध्यमातून विद्यापीठातील सोई-सुविधांचे आॅडिट केल्याचे शाळीग्राम यांनी सांगितले.
राज्यातील एकूण २७ विद्यापीठांपैकी विदर्भात नऊ विद्यापीठ आहेत. असे असताना विदर्भातील एकाही विद्यापीठाला प्रस्ताव सादर करण्याची संधी मिळू नये, ही आश्चर्यकारक बाब मानली जात आहे.
योजनेसाठी विद्यापीठाकडून प्रस्ताव पाठविण्याबाबत केंद्र सरकारचे पत्र प्राप्त झाले नाही. किमान स्पर्धेत सहभागी होण्याची संधी तरी मिळायला हवी.
- मुरलीधर चांदेकर
कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
मध्य भारतात नागपूर विद्यापीठ सर्वात जुने आहे. ‘वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी’च्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून कोणतेही पत्रव्यवहार झालेला नाही.
- सिद्धार्थविनायक काणे
कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ