विदर्भातील डॉक्टर आजपासून संपावर
By admin | Published: November 25, 2015 03:46 AM2015-11-25T03:46:28+5:302015-11-25T03:46:28+5:30
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्यवहारे यांच्या जाचाबाबत पदव्युत्तर आणि पूर्वपदवीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे तक्रारी केल्या.
मुंबई : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्यवहारे यांच्या जाचाबाबत पदव्युत्तर आणि पूर्वपदवीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे तक्रारी केल्या. पण, डॉ. व्यवहारे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडंट डॉक्टर्सने (मार्ड) राज्यव्यापी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. नागपूरचे आयजीएमसी आणि यवतमाळचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर बुधवार सकाळपासून संपावर जाणार आहेत, तर गुरुवारपासून राज्यातील अन्य निवासी डॉक्टर बेमुदत संपात सहभागी होतील.
नागपूरच्या जीएमसीत न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्यवहारे विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे येथील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. एका विद्यार्थ्याने २० नोव्हेंबर रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत विभाग प्रमुख डॉ. व्यवहारे यांच्या जाचाला कंटाळल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी पदव्युत्त शिक्षण घेणाऱ्या एका मुलीनेदेखील या विभाग प्रमुखांविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदविली होती. त्यानंतर रविवारी पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी या विभाग प्रमुखांच्या विरोधात तक्रार केली, असे मार्डचे उपाध्यक्ष डॉ. अमित लोमटे यांनी सांगितले.
या विभाग प्रमुखांची सखोल चौकशी व्हावी. या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश नेमण्यात यावा. या विभाग प्रमुखांची ज्या ठिकाणी विद्यार्थी नसतील, अशा केवळ हॉस्पिटल असलेल्या ठिकाणी बदली करावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची बदली करावी, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे अथवा त्यांना निलंबित करावे अशा मार्डच्या प्रमुख मागण्या आहेत.
या विभाग प्रमुखांविरोधात इतक्या तक्रारी येऊनही रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. विभाग प्रमुखांची सखोल चौकशी करावी, असे निवेदन स्थानिक मार्डने दिले होते. मात्र, याची प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली नाही. या संदर्भातील सुनावणीवेळीही विभाग प्रमुख उपस्थित नव्हते. त्यांनी त्यांची बाजूदेखील मांडली नाही. त्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे मार्डचे म्हणणे आहे. त्यामुळे जीएमसी मार्ड सोमवारपासून संपावर गेले आहे. तरीही अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)
न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्यवहारे यांच्या जाचाबाबत पदव्युत्तर आणि पूर्वपदवीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे तक्रारी केल्या. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे मार्डने संप पुकारला आहे.
विभाग प्रमुखांची सखोल चौकशी करावी असे निवेदन स्थानिक मार्डने दिले होते. मात्र, याची प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली नाही.