विदर्भामधील दुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 06:58 AM2019-05-05T06:58:28+5:302019-05-05T06:58:59+5:30

दुष्काळामुळे विदर्भातील दुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. वाशीम व यवतमाळ जिल्ह्यामधून हजारो शेतकरी व शेतमजुरांनी कुटुंबासह मार्च महिन्यापासूनच नवी मुंबईत स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

Vidarbha's Drought Victim in Navi Mumbai | विदर्भामधील दुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल

विदर्भामधील दुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल

googlenewsNext

- नामदेव मोरे
नवी मुंबई  - दुष्काळामुळेविदर्भातीलदुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. वाशीम व यवतमाळ जिल्ह्यामधून हजारो शेतकरी व शेतमजुरांनी कुटुंबासह मार्च महिन्यापासूनच नवी मुंबईत स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही जिल्ह्यांमधील कुटुंबांनी सानपाडा येथील दत्त मंदिराजवळील उड्डाणपूल, नेरूळ, जुईनगर, एमआयडीसीमधील मोकळ्या भूखंडावर संसार थाटला आहे.

पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल, अशा ठिकाणी निवारा करून उघड्यावरच दगडाची चूल करून त्यावर स्वयंपाक केला जात आहे. ते सकाळी तुर्भे, नेरूळ व वाशीमधील नाक्यावर कामाच्या शोधात उभे राहत आहेत. बहुतांश दुष्काळग्रस्त नाका कामगार म्हणून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

दुष्काळामुळे गावाकडे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. एक ते दोन किलोमीटर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शेतीमध्ये काही पिकत नाही व गावाकडे रोजगाराचे कोणतेच साधन नसल्यामुळे स्थलांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची माहिती त्यांनी दिली.

महापालिका प्रशासनाने दुष्काळग्रस्तांसाठी तात्पुरत्या स्वरूपात पाणी, आरोग्य सुविधा, फिरते शौचालय उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी दुष्काळग्रस्तांनी केली आहे.

गावामध्ये पाण्याची सोय नाही, मुलाचा ४० वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. नातवाचा अपघात झाल्यामुळे उपचारासाठी कर्ज काढावे लागले. गावाकडे रोजगारही मिळत नसल्यामुळे मुंबईत आलो असून, पावसाळ्यापर्यंत येथेच थांबणार आहोत.
- शंकर कालापहाड, बाभूळगाव, वाशिम

गावी दोन एकर जमीन आहे; पण दुष्काळामुळे काही पिकत नाही. नाका कामगार म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.
- भारत गोविंद महाजन,
माळवा, (ता. महागाव, जि. यवतमाळ)

दुष्काळामुळे शेती ओस पडली आहे. मजुरीची कामेही मिळत नाहीत. उपासमारीची वेळ आल्यामुळे येथे मिळेल ते काम करून उपजीविका करत आहोत.
- अमृत सखाराम गजभार, बोरगाव (ता. मालेगाव, जि. वाशिम)

फेब्रुवारी महिन्यापासून गावात पाणीटंचाई सुरू झाली आहे. येथे रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहोत.
- वंदना कालापहाड, मांडवा डिब्रस (ता. हरसूल, जि. यवतमाळ)

मुंबईतही समस्यांचा डोंगर
विदर्भातील दुष्काळग्रस्तांच्या समस्या मुंबई व नवी मुंबईमध्ये आल्यानंतरही संपलेल्या नाहीत. येथे पुलाखाली उघड्यावरच दगडाची चूल करून स्वयंपाक करावा लागत आहे. मंदिर किंवा गळती सुरू असलेल्या जलवाहिनीवरून पाणी
भरावे लागत आहे. रात्री पुलाखाली व मोकळ्या भूखंडावर थांबणे धोकादायक असल्याने अनेक जण रेल्वे स्टेशन, पादचारी पुलावर मुक्कामासाठी जात आहेत.

Web Title: Vidarbha's Drought Victim in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.