विदर्भातील कोरडवाहू शेती अभियान थांबले
By admin | Published: September 21, 2015 01:11 AM2015-09-21T01:11:59+5:302015-09-21T01:11:59+5:30
विदर्भातील वाढत्या शेतकरी आत्महत्या थांबाव्यात म्हणून तत्कालीन राज्य सरकारने कोरडवाहू शेती अभियान हाती घेतले होते. हे अभियान तीन वर्षे राबविले जाणार होते.
यवतमाळ : विदर्भातील वाढत्या शेतकरी आत्महत्या थांबाव्यात म्हणून तत्कालीन राज्य सरकारने कोरडवाहू शेती अभियान हाती घेतले होते. हे अभियान तीन वर्षे राबविले जाणार होते. मात्र सत्ताबदल होताच या अभियानाला निधी मिळणे बंद झाले आहे, त्यामुळे अमरावती विभागातील ५१ गावांतील काम थांबले आहे.
विदर्भातील शेती सिंचनाखाली यावी म्हणून २०१३-१४मध्ये कोरडवाहू शेती अभियान हाती घेण्यात आले. हे अभियान २०१६-१७पर्यंत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अभियानासाठी प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड करण्यात आली असून, तेथे विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. योजनेच्या अंमलबजावणीसाठी तत्कालीन राज्य सरकारने निधीची तरतूद केली होती. मात्र सरकार बदलताच निधी थांबला आहे. त्यामुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्पालाच ब्रेक लागला आहे. (वार्ताहर)