विदर्भात शिवसेनेची नीचांकी कामगिरी
By Admin | Published: October 24, 2014 04:32 AM2014-10-24T04:32:57+5:302014-10-24T04:32:57+5:30
विदर्भातून शिवसेनेचे यावेळी केवळ चार आमदार निवडून आले. ही या पक्षाची १९९५ पासूनची नीचांकी कामगिरी आहे.
मुंबई : विदर्भातून शिवसेनेचे यावेळी केवळ चार आमदार निवडून आले. ही या पक्षाची १९९५ पासूनची नीचांकी कामगिरी आहे. शिवसेनेने पूर्व विदर्भात एक आणि पश्चिम विदर्भात तीन जागा जिंकल्या. गेल्यावेळी हा आकडा तीन आणि पाच असा होता.
१९९५ मध्ये युतीच्या लाटेत शिवसेनेला विदर्भात ११ जागा मिळाल्या होत्या. त्या यशाची गेल्या १९ वर्षांत पुनरावृत्ती करता आलेली नाही. हिंदुत्वाचा भगवा खांद्यावर घेऊन आलेल्या शिवसेनेला एकेकाळी विदर्भात प्रचंड समर्थन मिळाले होते. शिवसेनेचे मुंबईतून आलेले नेते आणि उदयास आलेले स्थानिक आक्रमक नेते यांनी वातावरण भगवामय केले होते. मात्र गेल्या १५ वर्षांत मुंबईहून जिल्ह्णाजिल्ह्णात आलेल्या संपर्क प्रमुखांबद्दल नाराजीचे सूर गडद झाले. संपर्क प्रमुखांशी खास असेल त्याचेच नाव मातोश्रीपर्यंत पोहोचेल, असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे या संपर्क प्रमुखांची विविध प्रकारे सेवा करीत राहणे याला महत्त्व आले.
आक्रमक हिंदुत्वाच्या आधारे शिवसेनेने विदर्भात दमदार पाऊल ठेवले होते. मात्र, त्याचा नंतरच्या काळात विसर पडत गेला. संघ-भाजपाच्या तुलनेत शिवसेनेचे असलेले आक्रमक हिंदुत्व तरुणांना आकर्षित करणारे होते पण ते पुढे टिकले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणाऱ्या तरुणांना बांधून ठेवेल, अशी यंत्रणा उभारता आली नाही. गेल्या कित्येक वर्षांत शिवसेनेने विदर्भातून एकाही नेत्याला विधान परिषद वा राज्यसभेची संधी दिली नाही. विदर्भातील आमदार मुंबईच्या नेत्यांना मते देत राहिले.