विदर्भाचा आवाज, महाराष्ट्राचा हुंकार
By admin | Published: May 2, 2017 04:33 AM2017-05-02T04:33:06+5:302017-05-02T04:33:06+5:30
वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून सोमवारी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला. विविध
नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून सोमवारी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विदर्भवाद्यांनी आपला निषेध व्यक्त करत स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी लावून धरली. दुसरीकडे अखंड महाराष्ट्रवाद्यांनीदेखील महाराष्ट्र दिनाचा जल्लोष केला. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र काही तुरळक घटना वगळता एकूणच १ मेचा दिवस शांततेत पार पडला.
राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात बजाजनगर येथील ‘विष्णूजी की रसोई’ येथे सकाळी ९ वाजता स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकविण्यात आला. या वेळी विविध विदर्भवादी संघटनांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी जनमंच, विदर्भ कनेक्ट, विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी यांसारख्या विविध विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दुसरीकडे सकाळी ९.३०च्या सुमारास विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे गिरीपेठ येथील कार्यालयाजवळ वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने
काही विदर्भवाद्यांनी धरमपेठ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने केली. भाजपाने विदर्भ राज्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी त्वरित हालचाल करीत अवघ्या मिनिटाभरातच सात ते आठ आंदोलकांना ताब्यात घेतले.
मनसेतर्फे आतशबाजी
बजाजनगरात एकीकडे वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकविला जात असताना बाजूलाच मनसेतर्फे शहरातील काही ठिकाणी जल्लोष करण्यात आला. मध्यरात्री धरमपेठेत आतशबाजी करून महाराष्ट्र दिनाचे स्वागत करण्यात आले. शिवाय शहरात मिठाईचे वाटपदेखील करण्यात आले. या वेळी श्रमिक व कामगारांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, दुपट्टा, होमिओपॅथी औषध वितरित करण्यात आले. (प्रतिनिधी)
नागपुरात प्रारंभ
वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसंदर्भात ‘विरा’तर्फे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच निवेदन देण्यात येणार आहे. पंतप्रधानांना पाठविण्यात येणाऱ्या पत्रावर विदर्भवादी स्वत:च्या रक्ताचा अंगठा लावणार आहेत. अॅड. श्रीहरी अणे यांनी मेहाडिया चौकात आयोजित कार्यक्रमादरम्यान रक्ताने स्वाक्षरी या मोहिमेची सुरुवात केली.
अकोल्यात विदर्भवाद्यांना धक्काबुक्की!
अकोला : वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या विदर्भवाद्यांच्या आंदोलनात शिवसैनिकांनी प्रचंड धुडगूस घालून आंदोलन उधळून लावले. स्थानिक मदनलाल धिंग्रा चौकात ब्रजलाल बियाणी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वेगळ्या विदर्भाचे नारे देणाऱ्या विदर्भवाद्यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की करत विदर्भाच्या झेंड्याची होळी केल्याचा प्रकार सोमवारी घडला. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यामुळे पुढील प्रकरण निवळले.