नीतेश राणेंविरोधात सरसावले विदर्भवादी
By admin | Published: August 25, 2016 09:26 PM2016-08-25T21:26:54+5:302016-08-25T21:26:54+5:30
राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांच्यासोबत विदर्भवाद्यांना मारण्याचे वक्तव्य करणारे कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांच्याविरोधात विदर्भवादी सरसावले आहेत.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 25 : राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांच्यासोबत विदर्भवाद्यांना मारण्याचे वक्तव्य करणारे कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांच्याविरोधात विदर्भवादी सरसावले आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी राणेंविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल केल्या. मारण्याची धमकी देणाऱ्या राणे यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. गुरुवारी नीतेश राणे यांचा हिंगणघाट येथे पुतळा जाळून निषेध करण्यात आला.
नीतेश राणे बुधवारी नागपुरात आले असताना त्यांनी विदर्भवाद्यांवर जोरदार टीका करीत वेळ पडली तर मार देण्याची भाषा वापरली होती. यासंदर्भात सुरुवातीला विदर्भवाद्यांनी राणे यांच्याकडे दुर्लक्षच करण्याची भूमिका घेतली होती. परंतु गुरुवारी मात्र विदर्भात अनेक ठिकाणी विदर्भवाद्यांनी राणेंविरोधात पोलीस तक्रार केली. नीतेश राणे यांनी भडकावू वक्तव्य केले असून विदर्भातील जनतेचा अपमान केला आहे. त्यांनी उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली असून याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी विदर्भवाद्यांची मागणी आहे.
विदर्भात अनेक ठिकाणी नीतेश राणे यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आला. नागपूर, वणी, साकोली, तुमसर, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर येथे विदर्भवादी कार्यकर्त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी केल्या. नीतेश राणे यांनी सार्वजनिकपणे विदर्भवादी नेत्यांना मारण्याची धमकी दिली आहे. यापुढे विदर्भवादी नेता किंवा कार्यकर्त्यांसोबत कुठलाही हल्ला झाला तर त्याला नीतेश राणे हेच जबाबदार राहतील, अशी विदर्भवाद्यांनी भूमिका घेतली आहे.