VIDEO : धावडशीच्या डोंगररांगांमध्ये पक्ष्यांसाठी ५० पाणपोई
By Admin | Published: April 26, 2017 06:41 PM2017-04-26T18:41:07+5:302017-04-26T18:48:12+5:30
ऑनलाइन लोकमत सातारा, दि. 26 - वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका पक्ष्यांना बसू लागला आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने अनेक ...
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 26 - वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका पक्ष्यांना बसू लागला आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने अनेक पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. या घटना थांबविण्यासाठी धावडशीमधील नेहरू युवा मंडळातील कार्यकर्त्यांनी धावडशी-मेरुलिंगच्या डोंगरातील पाचपट शिवारात पक्ष्यांसाठी खाद्यान्न आणि ५० ठिकाणी पाणपोई सुरू केल्या आहेत. या पाणपोई पक्ष्यांसाठी जीवनदायी ठरू लागल्या आहेत.
धावडशीला निसर्गाचे वरदान लाभले आहे. पिंपळवाडी ते धावडशी आणि धावडशी ते आकले तसेच मेरुलिंग या दरम्यान डोंगररांगा व घनदाट जंगल परिसर लाभला आहे. या परिसरामध्ये जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळून येते. तसेच या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी, सरपटणारे व उभयचर प्राणी, रंगीबेरंगी फुलपाखरे, नानाविध प्रकारचे कीटक, फळझाडे, फुलझाडे आढळतात. या ठिकाणी घनदाट झाडी असून, तीव्र उकाड्यामुळे जंगलातील पाण्याचे झरे आटले असून, पशु-पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने त्यांचा मृत्यू होऊ लागला आहे. पक्ष्यांचा होणारा मृत्यू टाळण्यासाठी नेहरू युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन या डोंगररांगांमध्ये झाडांच्या फांद्यावर पक्ष्यांना खादान्नासह ५० पाणपोई सुरू केल्या आहेत. पक्ष्यांच्या खाद्यान्नामध्ये छोटी प्लास्टिक बाटली साईडला कापून त्यामध्ये ज्वारीचे कणीस ठेवण्यात आले आहे. तसेच पाण्याच्या बाटली मध्येच कापून त्या झाडांच्या फांद्यावर पक्ष्यांना पाणी पिता येईल, अशा पद्धतीने बांधल्या जात आहेत. या बाटलीमध्ये दोन दिवसांनी पाणी भरले जात आहे. डोंगरावर पाणी नसल्याने गावापासून २० लिटरचा कॅन भरून या चार किलोमीटर परिघामधील पाणपोईपर्यंत नेल्या जात आहेत. एक आठवड्यापासून नियमितपणे पक्ष्यांना पाणी देण्याचे काम सुरू असून, अजून बºयाच ठिकाणी नवीन पाणपोई सुरू केल्या जाणार आहेत.
पाणपोई बसविताना त्या परिसराची पाहणी करण्यात आली. पक्ष्यांची वर्दळ कोणत्या परिसरात अधिक असते. आंबा व इतर फळझाडे कुठे आहेत. याचा अभ्यास करून आवश्यक त्याठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होऊ लागले आहेत. जूनअखेरपर्यंत उन्हाची तीव्रता अशीच राहणार आहे. यामुळे प्रत्येकांनी त्यांना शक्य त्याप्रमाणे पशु-पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी आपल्या अंगणात वा नजीकच्या परिसरात उपलब्ध करून द्यावे, असे आवाहनही नेहरू युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
यावेळी या उपक्रमात संतोष पवार, मनोज पवार, सागर मोरे, अक्षय पवार, देवेंद्र चोरगे, उमेश चोरगे, अनिकेत पवार, शिरीष कापसे आदी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
https://www.dailymotion.com/video/x844w7v
पाण्याअभावी पशु-पक्ष्यांचे स्थलांतर
सध्या सर्वत्र पाणीटंचाईचे गडद दृष्य पाहताना मिळत आहे. यात मुख्यत: मोठा फटका पशु-पक्ष्यांना बसला आहे. उन्हाचा वाढता पारा आणि पाण्याची भीषण टंचाई, यामुळे जंगलातील पशु-पक्ष्यांचे स्थलांतर होत आहे. जंगलात पाणीच नसल्याने आतापर्यंत पशु-पक्ष्यांना प्राणाला मुकावे लागत आहे. यामुळे याचा मोठा परिणाम सध्या ग्रामीण भागासह शहरी भागात दिसून येत आहे.
दोन दिवसांनी भरणार बाटलीत पाणी
तीव्र उन्हाळ्यामुळे जंगलातील पक्ष्यांचाही मृत्यू होत आहे. या घटना थांबविण्यासाठी आम्ही धावडशीच्या डोंगररांगांमध्ये ५० ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू केली आहे. अजून घराच्या अंगणासह नजीकच्या परिसरातही नवीन पाणपोई सुरू केल्या जाणार आहेत. दोन दिवसांनी प्रत्येक बाटलीमध्ये पाणी भरण्यात येत असल्याची माहितीही यावेळी नेहरू युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली.
ब्रह्मेंद्रस्वामी हायस्कूल परिसरातही पाणपोई
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने श्री ब्रह्मेंद्रस्वामी हायस्कूल परिसरातही पक्ष्यांसाठी खाद्यान्न आणि पाणपोई बांधण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक धनंजय सूर्यवंशी यांनी सुरू केलेल्या अभियानाचे विशेष कौतुक केले. यावेळी सीताराम पवार यांच्यासह ग्रामस्थही उपस्थित होते.