VIDEO : 500-1000 च्या नोटांचा विठ्ठल भक्तांना सुद्धा फटका
By Admin | Published: November 9, 2016 04:13 PM2016-11-09T16:13:41+5:302016-11-09T16:28:59+5:30
ऑनलाइन लोकमत/सचिन कांबळे पंढरपूर, दि. 09 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या ऐतिहासिक ...
ऑनलाइन लोकमत/सचिन कांबळे
पंढरपूर, दि. 09 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या ऐतिहासिक निर्णय मंगळवारी रात्री घेतल्यामुळे अमाप काळा पैसा असणारा वर्ग अडचणीत आला आहे. त्याबरोबर सर्व सामान्य वर्गालाही या निर्णयचा सध्या मोठा फटका बसत असल्याचे जाणवत आहे. पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना या निर्णयामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कार्तिकी यात्रेनिमित्त सध्या पंढरपुरात लाखो भाविक येतात. पंढरपुरात येताना खर्चासाठी म्हणून भाविक 500 आणि 1000च्या नोटा घेऊन येतात. यामुळे जादा पैसे असल्याचे जाणीव होत नाही. त्याचबरोबर पैसे चोरी होण्याची शक्यताही कमी असते. यामुळे 500 आणि 1000 च्या नोटा भाविक घेऊन येतात.
मात्र मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सकाळी पंढरपुरातील हॉटेल, लॉज, भक्त निवास, खेळणी, गाड्या, प्रसाद साहित्य व विविध वस्तु विक्री करणारे व्यापा-यांनी रात्रीपासूनच 500 आणि 1000 च्या नोटा घेण्यास नकार दिला. यामुळे अनेक भाविकांना सकाळी नाष्टापासून वंचित राहावे लागले आहे. पंढरपुरात पैसे सुट्टे मिळत नसल्याने अनेक वारक-यांना पंढरपुरातून माघारी परतावे लागत आहे.
दुकानात नोटा बंदचे फलक
पंढरपुरातील अनेक व्यापा-यांनी आपल्या दुकानात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद असे फलक लावले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी सुट्ट्या पैशावरुन वाद निर्माण होत आहेत.
आम्ही २२ जण कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यासाठी सह कुटुंब आलो आहोत. परंतु काल रात्रीपासून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्या आहेत. यामुळे साधा साध्या वस्तु खरेदी करताना अडचणी निर्माण होत आहे. त्याचबरोबर राहण्याची व खाण्याचीही गैरसोय होत आहे. यामुळे लवकरच आपल्या गावी परतणार आहेत.
- प्रशांत मेरस
भाविक, (रा. साखरखेरडा, जि. बुलढाणा)
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यापुर्वी शासनाने सुचना देणे आवश्यक होते. अशी कोणत्याही प्रकारची सुचना न दिल्याने पंढरपुर येथे कार्तिकी यात्रेसाठी आलेले भाविकांचे विविध समस्यांना समोरे जावे लागत आहे.
- सिध्दनाथ कोरे
जिल्हा उपाध्यक्ष, ग्राहक संरक्षण कक्ष, शिवसेना
ग्राहक 500 आणि 1000 च्या नोटा देत आहेत. त्यांना सुट्टे देण्यासाठी १०० रुपयांच्या नोटा नाहीत. यामुळे ग्राहकांना माल विक्री करता येत नाही. यामुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी असून देखील जादा व्यवसाय होणार नाही.
- व्यंकटेश अवताडे
व्यापारी, पंढरपूर
https://www.dailymotion.com/video/x844hcs