VIDEO : बांबूच्या सायकलवरून आसेतूहिमाचल प्रवास
By Admin | Published: July 14, 2016 10:38 PM2016-07-14T22:38:13+5:302016-07-14T22:38:55+5:30
गेल्या काही वर्षांमध्ये सायकल प्रेमींची संख्या पुन्हा वाढीस लागली आहे. शहरांमधील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय म्हणून सायकलकडे पाहिले जात आहे. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सायकलवरून
- ओंकार करंबेळकर
मुंबई, दि. १४ - गेल्या काही वर्षांमध्ये सायकल प्रेमींची संख्या पुन्हा वाढीस लागली आहे. शहरांमधील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय म्हणून सायकलकडे पाहिले जात आहे. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सायकलवरून कार्यालयात जायला सुरु केले आहे. सायकलिंगच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यासाठी पनवेलकर सुमित पारिंगे आणि प्रिसिलिया मदन यांनी कन्याकुमारी ते खार्दुंग ला खिंड असा प्रवास सुरु केला आहे. गुरुवार १४ जुलैपासून सुरु झालेला हा प्रवास ६३ दिवसांचा असणार आहे. या कालावधीत ते ४२०० किमी सायकलींग करणार असून देशाच्या १२ राज्यांमधून ते प्रवास करणार आहेत.
सायकलींगच्या या प्रवासाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सायकली बांबूपासून बनवलेल्या आहेत. सुमित आणि प्रिसिलिया यांना सायकलिंगची आवड लहानपणापासूनच आहे. २६ वर्षांच्या सुमितने यापुर्वी सप्टेंबर २०१४ मध्ये पनवेल पासून खांर्दुंग ला हा प्रवास सायकलने केला आहे. तर केवळ २२ वर्षे वयाच्या प्रिसिलिया मदन हिने २०१६ म्हणजे याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये पनवेल ते कन्याकुमारी असा १८०० किमीचा प्रवास सायकलने तोही एकटीनेच पूर्ण केला. सुमित आणि प्रिसिलिया यांना ट्रेकिंगची विशेष आवड आहे. साहस आणि छंद जपत त्यांनी आता मुलींच्या शिक्षणासाठी संदेश देण्यासाठी ही सायकल मोहीम सुरु केली आहे. प्रिसिलियाचे बाबा धनंजय मदन यांनाही ट्रेकिंग आणि सायकलिंगची आवड आहे, त्यांच्यामुळेच आपल्यामध्ये सायकलिंग व साहसाची आवड निर्माण झाली असे प्रिसिलिया सांगते.