व्हिडिओ - पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीचा तलावात बुडून मृत्यू

By admin | Published: May 7, 2016 05:10 PM2016-05-07T17:10:05+5:302016-05-07T18:03:01+5:30

पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे, हा सर्व प्रकार कॅमे-यात कैद झाला आहे ज्यामध्ये तलावात पोलीस आणि आरोपीमध्ये झटापट होताना दिसत आहे.

Video - The accused escaped from the police custody and died in the lake | व्हिडिओ - पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीचा तलावात बुडून मृत्यू

व्हिडिओ - पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीचा तलावात बुडून मृत्यू

Next
ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 7 - पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. नंदकिशोर बाबूराव सावंत असं या आरोपीचं नाव असून ओरोस येथील जिल्हा न्यायालयात हजर करून पुन्हा सावंतवाडीतील कारागृहात नेले जात असताना त्याने पोलिसांच्या हाताचा चावा घेऊन येथील मोती तलावात उडी टाकली. पोलिसांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीचा बुडून मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार कॅमे-यात कैद झाला आहे ज्यामध्ये तलावात पोलीस आणि आरोपीमध्ये झटापट होताना दिसत आहे. 
 
आरोपीसोबत असणाऱ्या दोन पोलिसांनी आरोपीला बाहेर काढण्यासाठी तलावात उडी मारली. आरोपीसोबत त्यांची सुरू असलेली झटापट पाहून प्रसंगावधान राखत नागरिकांनी दोन्ही पोलिसांना बाहेर काढले. परंतु आरोपी सावंत याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. 
 
आरोपीला वाचवण्यास गेलेल्या दोघा पोलिसांच्या छातीत व पोटात पाणी गेल्याने ते अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  मालवण इथल्या स्कुबा डायव्हिंगच्या पथकाने मोती तलावातून आरोपीचा मृतदेह बाहेर काढला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथे पाठविण्यात येणार आहे. आरोपी पलायन आणि मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयडी पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. 

 
कुडाळ येथे वडिलांवर पाळ-कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी नंदकिशोर सावंत ३१ मे २०१५ पासून सावंतवाडी कारागृहात बंद आहे. पोलिस त्याला प्रत्येक तारखेला ओरोस येथील न्यायालयात हजेरीसाठी घेऊन जात होते. त्याप्रमाणेच शुक्रवारी सकाळी पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गवस व कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण हे सकाळी सावंतला ओरोस न्यायालयात घेऊन आले होते. न्यायालयाने २७ मे ही पुढील तारीख दिल्यानंतर आरोपी सावंतला घेऊन पोलीस एसटी बसने सावंतवाडीला आले. बसस्थानकातून आरोपीला घेऊन कारागृहाकडे पायी जात असताना मोती तलावाच्या काठावर आरोपी सावंतने पोलीस प्रदीप चव्हाण यांच्या हाताचा चावा घेतला आणि मोती तलावात उडी मारली. यामुळे दोन्ही पोलीस गांगरून गेले. त्यांनीही तलावात उडी घेऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपीच्या झटापटीत त्यांचाच जीव धोक्यात आला. अखेर प्रसंगावधान राखत नागरिकांनी पोलिसांनी तलावाबाहेर काढले.
 
 
आरोपी मेकॅनिक इंजिनीअर, मात्र मनोरुग्ण
आरोपी नंदकिशोर सावंत हा उच्चशिक्षित असून मेकॅनिकल इंजिनीअर आहे. मात्र, तो मनोरूग्ण असल्याचे, त्याच्या आईने पोलिसांच्या जबानीत सांगितले आहे.

Web Title: Video - The accused escaped from the police custody and died in the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.