VIDEO : प्रत्यक्ष परमेश्वराला घडविणारे हात !
By Admin | Published: August 25, 2016 12:50 PM2016-08-25T12:50:36+5:302016-08-25T15:10:31+5:30
दगडातील नको असलेला भाग बाजूला करून छिन्नी हातोड्याचे घाव घालून परमेश्वराची मूर्ती घडवणारे बीडच्या आंभोरे येथील पंडित बंधूंची कथा..
प्रताप नलावडे
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २५ - त्या दोन भावांचे हात अगदी सराईतपणे समोरच्या दगडावर छन्नी हातोड्याने घाव घालत राहतात. समोरच्या दगडातील नको असलेला भाग बाजुला करत दगडाला आकार देत राहतात आणि मग अनेक दिवसांच्या या मेहनतीनंतर दगडातील अनावश्यक भाग काढून त्यांनी तयार होते प्रत्यक्ष परमेश्वराची अप्रतिम देखणी मूर्ती. कधी पंढरीचा विठोबा तर कधी स्वामी समर्थ...कधी श्रीकृष्णाचे सावळे सुंदर रूप तर कधी श्रीरामाची लोभस प्रतिमा...
बीड आणि अहमदनगरच्या सीमेवर असलेलं अवघ्या बाराशे लोकवस्तीच आंभोरा हे गाव. डोंगराच्या कुशीत असलेले आणि चोहोबाजुने निसर्गाची उधळण असणा-या या गावाची ओळख आता मूर्तीकाराचे गाव म्हणूनच बनली आहे. बाळासाहेब व भीमराव पंडित या दोघा भावांनी गावातच मुर्ती तयार करण्याचे काम सुरू केले. त्यांनी तयार केलेल्या दगडी मुर्तीमधून असलेला जीवंतपणा आणि देखणेपणा यामुळे अगदी अल्पावधीत त्यांच्या मूर्तींना मागणी वाढली. संपूर्ण राज्यात अंभो-याची मूर्ती सध्या जात असून पंडित बंधूनी तयार केलेली मूर्ती हवी असेल तर त्यासाठी सहा महिने आधी त्यांच्याशी संपर्क साधावा लागतो.
एक मूर्ती तयार करण्यासाठी साधारणपणे त्यांना पाच महिन्यांचा कालवधी लागतो. दोघेही बंधू मूर्ती तयार करतात. आपल्या वडीलांकडून त्यांनी ही कला आत्मसात केली आहे. व्यवसायाने सुवर्णकार असणारे त्यांचे वडील कृष्णराव हे मूर्ती तयार करत असत.
कर्नाटकातून कृष्णशीळा नावाचा खास दगड मूर्ती तयार करण्यासाठी वापरला जातो. पन्नास हजार रूपयांपासून ते पाच लाखापर्यंतच्या मुर्ती अंभो-यातून आजवर राज्यभरात गेल्या आहेत. अनेक नेत्यांच्या मूर्ती तयार करण्याचे कामही पंडित बंधूकडे येते. छायाचित्र पाहूनही त्यांनी काही मूर्ती तयार केल्या आहेत.