VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर करमाळ्यातील शेतक-यांचं आंदोलन मागे
By Admin | Published: June 8, 2017 01:37 PM2017-06-08T13:37:18+5:302017-06-08T13:45:29+5:30
ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 8 - मुख्यमंत्री येईपर्यंत मला जाळू नका, अशी अखेरची चिठ्ठी लिहून करमाळा तालुक्यातील वीट गावातील ...
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 8 - मुख्यमंत्री येईपर्यंत मला जाळू नका, अशी अखेरची चिठ्ठी लिहून करमाळा तालुक्यातील वीट गावातील कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमाराची ही घटना आहे. धनाची चंद्रकांत जाधव (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा संप सुरू असताना करमाळा तालुक्यात घडलेल्या या घटनेने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, धनाजी जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणी सरकारचा निषेध करण्यासाठी आज करमाळा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्याशिवाय जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांसह शेतक-यांनी घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी करमाळ्यात येऊन कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणीही वीट येथील ग्रामस्थांनी लावून धरली होती.
या पार्श्वभूमीवर, सरकारचा निषेध करण्यासाठी शेतक-यांनी अहमदनगर बायपासवर रास्तारोको आंदोलन केले होते. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. रास्तारोकोमुळे टेंभुर्णी-अहमदनगर राज्यमार्गावर शेकडो वाहने अडकून पडली होती. रास्ता रोको आंदोलनात जि.प.अध्यक्ष संजय शिंदे, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, काँग्रेसचे आमदार जयवंतराव जगताप सहभागी होते.
आंदोलनाच्या ठिकाणी पालकमंत्री विजयकुमार देशमुख दाखल झाले. त्यांनी फोनवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. फोनवरुन चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धनाजी जाधव यांच्या कुटुंबीयांना आश्वासन दिल्यानंतर अखेर गावक-यांनी आंदोलन मागे घेतले.
मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?
धनाजी जाधव अल्पभूधारक शेतकरी असल्यानं त्यांना कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आले. शिवाय, त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च व आर्थिक मदतीचं आश्वासनही देण्यात आले. व धनाजी जाधव यांच्या कुटुंबीयांना तातडीनं 1 लाख रुपयांची मदत करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
https://www.dailymotion.com/video/x8452jm