VIDEO - आणि बीडमध्ये स्टेजवर अवतरले बीग - बी
By admin | Published: August 6, 2016 03:27 PM2016-08-06T15:27:55+5:302016-08-06T15:35:58+5:30
वाय फाय सेवेच्या शुभारंभाचा कार्यक्रम अगदी रंगात आला होता. आर्चीची एक झलक पाहण्यासाठी गर्दी सैराट झाली होती
Next
>प्रताप नलावडे, ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 6 - वाय फाय सेवेच्या शुभारंभाचा कार्यक्रम अगदी रंगात आला होता. आर्चीची एक झलक पाहण्यासाठी गर्दी सैराट झाली होती. तरूणाई आर्ची...आर्ची असे ओरडत होती आणि इतक्यात स्टेजवरील खुर्चीत विराजमान असलेली संयोजक मंडळी एकदम उठून उभी राहिली...वेगळीच लगबग सुरू झाली...व्यासपीठाच्या पायाºयांवर पोलीसांची गर्दी झाली आणि पोलीसांच्या गराड्यात स्टेजवर अवतरले ते थेट बीग बी. उपस्थितांना अभिवादन करत त्यांनी खांद्यावरची शाल सावरली आणि आर्चीसाठी सैराट झालेल्या उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत बीग - बीचे स्वागत केले.
बीग बी यांनीही मग आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये हात हालवत सर्वांना हाय हॅलो केले आणि त्यानंतर त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये विनम्रतेने हात जोडले. डोळ्यावरचा चष्मा सावरत ते आर्चीच्या शेजारी स्थानपन्न झाल्यानंतर पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.
यानंतर आर्चीला घेऊन स्टेजवरील समोरच्या बाजुला बिग बी आले. हातात माईक घेऊन त्यांनी ‘बीडकरांना माझा नमस्कार’ असे म्हणताच पुन्हा लोकांनी टाळ्या वाजवत त्यांना प्रतिसाद दिला. आर्चीशी त्यांनी संवादही साधला आणि आपल्या आवडत्या आर्ची सोबत बीग बी पाहताना बीडकर याची डोळा याची देही अगदी धन्य धन्य झाले.
यानंतर बीग बी यांनी आपल्या दमदार आवाजात ‘कोशीश करने वालों की हार नही होती’.. ही कविताही म्हटली. त्यानंतर त्यांनी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्याशी व्यासपीठावर अगदी ‘कोन बनेगा करोडपती’च्या स्टाईलमध्ये संवादही साधला.
हे सगळे पहात असताना असे अचानक अवतरलेले बिग बी पाहून लोकांना तर क्षणभर आर्चीचाही विसर पडला. बिग बी वाय फाय सेवेचे उद्घाटन करण्यासाठी येणार हे या संयोजक मंडळींनी इतके गुपित कसे काय ठेवले, याचाही धक्का उपस्थितांनी काही वेळ पचवला परंतु त्यानंतर त्यांना धक्का बसला, जेव्हा व्यासपीठावरील बिग बी अर्थात अमिताभ हे खरेखुरे अमिताभ नसून त्यांचा डुप्लीकेट आहे, हे समजल्यावर.
नगरपालिका नेहमीच असे धक्के बीडकरांना देत असते. त्यामुळे हा धक्का पचवताना फारसा त्रास उपस्थितांना झाला नाही, इतकेच.