VIDEO - आणि त्याने खाटेच्या सहाय्याने कसली शेती........
By admin | Published: July 4, 2016 12:33 PM2016-07-04T12:33:59+5:302016-07-04T13:32:24+5:30
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील खडकी या गावातील विठोबा मांडवळी या शेतक-याकडे पैसा व शेतीची अवजारे नसल्याने त्याने अवघ्या एका खाटेच्या सहाय्याने नांगरणी केली.
Next
जळगाव, दि. ४ - कितीही संकटे आली तरी इच्छा असेल तर मार्ग नक्कीच निघतो. औताचे भाडे देण्याएवढे पैसे गाठिशी नसतानाही परिस्थितीपुढे हार न मानता लोखंडी खाटेने शेत आखून दोन एकरात कपाशीची लागण पूर्ण केली. दुष्काळाने त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी पावसाने राज्यभरात दमदार हजेरी लावली आहे. ब-याच उशिरा पावसाचे आगमन झाले असले तरी आता शेतीसाठी पूरक वातावरण तयार झाले असून अनेक शेतक-यांनी शेतीची कामे हाती घेतली आहेत. मात्र विठोबा मांडोळे यांच्याकडे पैसा व शेतीची अवजारे नसल्याने त्यांची शेतीची कामे अडकून पडली. मात्र या अडचणीमुळे खचून न जाता एक नामी शक्कल लढवत चक्क एका 'खाटे'च्या सहाय्याने शेतीची आखणी केली. त्यांच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
मांडोळे हे सुरुवातीला शेतमजुरीचे काम करायचे मात्र गेल्या सात वर्षांपासून इतरांचे शेत कसायला घेवून ते स्वत: शेती करीत आहेत. या दरम्यान त्यांनी मेहनतीतून बऱ्यापैकी प्रगती साधली. वयाच्या पंचेचाळीशीनंतर स्वत:चे घरही उभे केले. बैल जोडी घेतली. मात्र गेल्या दोन वर्षातील दुष्काळी परिस्थितीने त्यांना आर्थिक विवंचनेत टाकले. गेल्या वर्षी तर अधिकच नुकसान झाले. चारा- पाणी नसल्याने यंदा बैलजोडीही विकावी लागली.
हे सर्व आघात सहन करीत असताना यंदा नव्या उमेदीने ते पुन्हा उभे राहिले आहेत. तीन एकर शेत त्यांनी कसायला घेतले असून शेतात सऱ्या पाडण्यासाठी औताचे भाडे देण्याची ऐपत नसल्याने त्यांनी लोखंडी खाटेने शेत आखून दोन एकरात कपाशीचे बियाणे लावले आहे.
उर्वरीत एक एकरात मक्याचे बियाणे लावणार असून हे बियाणे त्यांनी उधारीवर आणले आहे. निसर्गाने साथ दिली, चांगला पाऊस पडला तरच कापूस आणि मका शेती बहरेल आणि आयुष्याचा सारा मोहोर फुलून जाईल, अशी आशा ते व्यक्त करतात.