VIDEO : वाशिमच्या शिक्षकाचा मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Published: March 21, 2017 08:38 PM2017-03-21T20:38:45+5:302017-03-21T20:40:53+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 21 - वाशिमच्या क्रांतिवीर लहूजी विद्या मंदिर या शाळेतील भानुदास खंदारे या सहाय्यक शिक्षकाने मंगळवारी ...
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - वाशिमच्या क्रांतिवीर लहूजी विद्या मंदिर या शाळेतील भानुदास खंदारे या सहाय्यक शिक्षकाने मंगळवारी आझाद मैदानात झाडावर चढून फाशी घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. गळ्यात दोरी टाकून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या खंदारे यांची आझाद मैदान पोलिसांनी योग्यवेळी समजूत काढून अनुचित प्रकार टाळला.
शाळा विनाअनुदानित असताना १९९२ रोजी खंदारे या शाळेत रुजू झाले होते. अनुसुचित जातीच्या प्रवर्गांचे शिक्षक म्हणून संस्थेने त्यांचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र अकोला शिक्षण विभागाने अप्रशिक्षित असल्याचे कारण देत त्यांचा प्रस्ताव नाकारला. मात्र त्यावेळी अनेक शाळांमध्ये अप्रशिक्षित शिक्षकांना मान्यता दिल्याचे निदर्शनास आणल्यानंतर खंदारे यांना मान्यता मिळाली. १९९७ साली शाळेला अनुदान मिळाले. त्यावेळी खंदारे यांची सेवा कायम करण्याऐवजी मुख्याध्यापकाने त्यांना प्रथामिकहून माध्यमिक वर्गांवर धाडले. शिवाय खंदारे यांच्याजागी दुसऱ्याच शिक्षकाची भरती केली. इथूनच खंदारे यांच्यावरील अन्यायाला सुरूवात झाली.
खंदारे यांनी सांगितले की, प्रामाणिकपणे शाळेची सेवा करत होतो. २ जून २००० साली अप्रशिक्षित शिक्षकांना सेवेत घेण्याचा शासन आदेश निर्गमित झाला. त्यावेळी मुख्याध्यापकांनी जाणीवपूर्वक डावलले. त्यामुळे डी.एड.चे शिक्षण घेतले. मात्र त्यानंतरही शिक्षण विभागाने अनुदानित तुकडीवर घेतले नाही. अखेर ३१ मे २००७ रोजी १५ वर्षांची सेवा मान्य करून विभागाने पदाला मान्यता दिली. १ जुलै २०११ रोजी सेवा सातत्य झाल्याचे शिक्षणाधिकारी यांनी पत्र दिले. २१ जानेवारी २०१३ रोजी माध्यमिक वर्गांच्या तुकड्यांना
२० टक्के अनुदान मंजूर झाले. त्यामुळे वनवास संपण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र मुख्याध्यापकांनी येथेही अन्याय करत वेतन फाईल शिक्षण विभागाकडे पाठवलेली नाही. अशा परिस्थिती मुख्याध्यापकावर कारवाई करण्याऐवजी शिक्षण विभाग दोषींना पाठीशी घालत असल्याचा खंदारे यांचा आरोप आहे.
म्हणून आत्महत्येचा निर्णय
गेल्या २५ वर्षांपासून पगाराच्या प्रतिक्षेत असल्याचे खंदारे यांनी सांगितले. अपार कष्ट घेऊन आई-वडीलांनी इतके शिकवले. आज त्यांच्यासह कुटुंबाची जबाबदारी आहे. आज नाहीतर उद्या पगार मिळेल, या आशेवर संघर्ष करत होतो. त्यासाठी अकोला शिक्षण विभागापासून मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होतो. मात्र अन्यायाशिवाय पदरात काहीच पडले नाही. घराचे भाडे थकले असून वीजबिल न भरल्याने घरात अंधार आहे. मुलांची फी भरण्याचे पैसे नसल्याने उपाशीपोटी कुटुंब घरात बसून आहे. वृद्ध आई-वडीलही माझ्या नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थिती कोणत्या तोंडाने घरी परतू, हा विचार मनात आल्याने अखेर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे खंदारे यांनी सांगितले.