VIDEO - 'हे राम नथुराम' नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न फसला
By Admin | Published: January 28, 2017 01:08 PM2017-01-28T13:08:02+5:302017-01-28T16:08:15+5:30
ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 28 - ‘हे राम, नथुराम’चा प्रयोग बंद पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडने ...
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 28 - ‘हे राम, नथुराम’चा प्रयोग बंद पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडने शनिवारी पुण्यात केला. पोलीसांनी ठेवलेल्या कडेकोट बंदोबस्तामुळे प्रयोग बंद पाडणे शक्य झाले नाही.
पुण्यातील अण्णाभाउ साठे सभागृहात दुपारी एक वाजता हा प्रयोग होतो. याची माहिती असल्याने कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे पोलीसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. कॉँग्रेसचे कार्यकर्ते जास्त आक्रमक होते. त्यांनी सभागृहात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांनी त्यांना रोखले. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ते मात्र एका बाजुला राहून घोषणा दिल्या.
शरद पोंक्षे यांचे हे नाटक असून यामध्ये गांधीजीचा मारेकरी नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या वेळी शिवसेनेचे कार्यकर्तेही नाटकाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. त्यांनी सभागृहाच्या मुख्यद्वाराला कडे करून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वीची 'हे राम नथुराम' विरोधातील निदर्शनं
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे बुधवारी रात्री ‘हे राम नथुराम’ या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी गोंधळ घालून, प्रयोग बंद पाडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज राजपूरकर यांच्यासह 10 जणांवर नौपाडा पोलिसांनी कारवाई केली.
नागपुरातही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व संभाजी ब्रिगेडने या नाटकाचा जोरदार विरोध करत डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहासमोर आंदोलन केले होते. नथुरामचे उदात्तीकरण करून महात्मा गांधी यांचा अपमान करण्याचा हा प्रयत्न असून नाटक बंद करावे, अशी मागणी या पक्षांतर्फे करण्यात आली होती.
औरंगाबादेत देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या नाटकाचा प्रयोगावेळीदेखील काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता.