VIDEO: अग्निशमन दलाच्या संग्रहालयाला प्रतिक्षा ‘दर्शकांची’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2017 09:16 PM2017-02-05T21:16:53+5:302017-02-05T21:16:53+5:30

ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 5 - आगीचे भीषण तांडव असो की नैसर्गिक आपत्ती असो, अपघात असो की महत्वाची बचावकार्ये ...

VIDEO: Awakening 'viewers' of firefighting museum | VIDEO: अग्निशमन दलाच्या संग्रहालयाला प्रतिक्षा ‘दर्शकांची’

VIDEO: अग्निशमन दलाच्या संग्रहालयाला प्रतिक्षा ‘दर्शकांची’

Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 5 - आगीचे भीषण तांडव असो की नैसर्गिक आपत्ती असो, अपघात असो की महत्वाची बचावकार्ये असोत पुणे अग्निशमन दलाचे जिगरबाज अधिकारी आणि जवान धावून जातात. पुणे अग्निशामक दलाच्या स्थापनेपासून ते आजवरच्या इतिहासाची झलक दाखवणारे आणि कर्तृत्वशाली कामगिरींचा लेखाजोखा मांडणारे प्रदर्शन अद्यापही दर्शकांच्या प्रतिक्षेत आहे. नागरिकांना हे संग्रहालय पाहण्यासाठी आकर्षित करण्याच्यादृष्टीने पालिकेकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. 
अग्निशामक दलाच्या एरंडवणा केंद्रामध्ये हे संग्रहालय महापालिकेमार्फत उभारण्यात आलेले आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. पुणे नगरपालिकेचे 1856 मध्ये स्थापना झाली. 1884 पर्यंत सार्वजनिक सुरक्षेचे काम शासनाकडे होते. त्या दरम्यानच्या आगीच्या घटनांना कसे तोंड देण्यात आले याचा इतिहास उपलब्ध नाही. मात्र 1884 ते 1914 ह्या काळायत हातपंप अथवा मॅन्युअल इंजिनाचा वापर केला जात होता. दुरध्वनीची व्यवस्था नसल्याने धावत जाऊन अथवा शिट्टी वाजवत जाऊन वर्दी द्यावी लागत असे. 1912-13 मध्ये नगरपालिकेने 2 लँड स्टीम फायर खरेदी केले. त्यानंतर बैलगाडीमधून ओढून न्यावे लागणारे हे यंत्र 1924 साली मोटारीमध्ये बसवण्यात आले. 1942 साली पुणे नगरपालिका, उपनगर विभाग आणि कॅन्टोन्मेंट विभागांनी एकत्रित फायरवाला सहकारी संघ स्थापन केला. 
1950 साली महापालिकेची स्थापना झाल्यावर अनेक छोटी खेडी, गावे मनपाच्या हद्दीत आली. त्यावेळी 6 हॉर्सपॉवरचे 5 पोर्टेबल पंप, 2 टेÑलर पंप, 450 गॅलन पाणी वाहून नेणारे 2 वॉटर टँकर अशी साधने घेण्यात आली. कालानुरुप अग्निशामक दलाचे स्वरुप विस्तारत गेले. अधिकारी आणि कर्मचा-यांची अधिकाधिक पदे भरण्यात आली. सध्या पुणे अग्निशामक दलात 14 केंद्रे कार्यरत असून काही केंद्र प्रस्तावित आहेत. अग्निशामक दलाने 2009 ते 2015 या कालावधीत तब्बल 30 हजार आगीच्या घटनांचा सामना केला आहे. 
या संग्रहालयामध्ये अग्निशामक दलाचा इतिहास, कायदे आणि घटनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यासोबतच अग्निशामक दलाच्या स्थापनेपासून वापरण्यात आलेली वाहने, विविध साधने यांचीही माहिती देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय अग्निशमन सेवा अकादमी व महाविद्यालयची तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी प्राण पणाला लावून सामना केलेल्या आगीचा प्रमुख घटनांची सविस्तर माहिती, वेळोवेळी घेण्यात येणा-या प्रात्यक्षिकांचाही संग्रहालयामध्ये समावेश करण्यात आला आहे. जर एखादी आपत्ती आलीच तर काय करावे याचेही मार्गदर्शन याठिकाणी पहायला मिळते. 
हे संग्रहालय म्हणजे पुणेकरांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या अग्निशामक दलाच्या जिगरबाज कामगिरीचा इतिहास आहे. दलाच्या जवानांच्या सोईसुविधा आणि सेवांकडे दुर्लक्ष केले जाते. जवानांकडे होणारे दुर्लक्ष एकवेळ मान्य आहे, मात्र त्यांचे कर्तृत्व तरी नाकारु नका अशी प्रतिक्रिया जवानांमधून नेहमी दिली जाते. त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष असलेल्या या संग्रहालयाकडे नागरिकांनी आकर्षित व्हावे याकरिता उपाययोजना राबवण्याची आवश्यकता आहे. 
 
कशी झाली अग्निशामक दलाची सुरुवात?
अमेरिकेतील बॉस्टनमध्ये 1631 मध्ये मोठी आग लागली होती. त्यानंतर 1648 मध्ये न्यू अ‍ॅमटरस्टॅममध्ये अग्निशामक दलाची स्थापना करण्यात आली. 1666 साली लंडमध्येही मोठा अग्निप्रलय झाला होता. त्यानंतर विमा कंपन्यांनी पुढाकार घेऊन अग्निशामक दलाची स्थापना केली. त्यानंतर इटली, जपान, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन आणि जर्मनीमध्ये स्वत:ची अग्निशामक दलाची स्थानपा झाली.
 
मुंबईमध्ये 1803 मध्ये लागलेल्या आगीत बराच भाग जळाला होता. अग्निशमनाची व्यवस्था नसल्याने खुप हानी झाली. त्यानंतर अग्निशामक दलाची स्थापना झाली. सुरुवातीला पोलिसांकडून आग विझवण्याचे काम व्हायचे. त्यानंतर 1 एप्रिल 1887 मुंबई महापालिकेने दलाची स्थापना केली. 1948 पर्यंत लंडन फायर ब्रिगेडमधून आलेल्या अधिका-यांनीच मुख्य पदे भुषवली. त्यानंतर दलाचे संपुर्ण भारतीयकरण करण्यात आले.
 
दलाची शान  ‘व्हीन्टेज व्हॅन’
पुणे अग्निशामक दलाची खरी शान म्हणजे  ‘व्हील एस्केप लॅडर फायर इंजिन वाहन.’ 3 जानेवारी 1956 रोजी पुणे दलामध्ये हे वाहन सामील झाले. उंच इमारतींच्या आगी विझवण्यासाठी या वाहनांचा विशेष उपयोग होत असे. उंच मजल्यांवर अडकलेल्या माणसांची सुटका करणे ह्या वाहनामुळे शक्य होत असे. त्याकाळी हे वाहन 88 हजार 593 आणि बारा आण्यांना विकत घेण्यात आले होते. रोल्स रॉईस बनावटीच्या ह्या वाहनात 8 सिलेंडरचे इंजीन आहे. गाडीवर 50 फुटांची शिडी आहे. गाडीवरील पंप सिंगल स्टेज डबल पिस्टन रोजी पॉकेटींग प्रायमिंग प्रकारातील आहे. 1990 पर्यंत हे वाहन दलाच्या सेवेत रुजू होते. त्यानंतर या वाहनाला सन्मानाने निवृत्ती देण्यात आली.

https://www.dailymotion.com/video/x844qi6

Web Title: VIDEO: Awakening 'viewers' of firefighting museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.