VIDEO: अजब ! नागाने दुस-या जिवंत नागाला केलं फस्त
By Admin | Published: June 14, 2017 04:41 PM2017-06-14T16:41:08+5:302017-06-14T17:33:30+5:30
मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे निसर्गास धोका : पोर्ले तर्फ ठाणे येथील जंगलातील प्रकार सरदार चौगुले / ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, ...
मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे निसर्गास धोका : पोर्ले तर्फ ठाणे येथील जंगलातील प्रकार
सरदार चौगुले / ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 14 - मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे निसर्गातील अनेक परिसंस्थांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परिणामी, काही प्राणी जगण्यासाठी आपल्यातीलच लहान प्राण्यांची शिकार करताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील तळीमाळाच्या टेकडीवरील जंगलात अनुभवायास मिळाला. येथे एका मोठ्या नागाने लहान नागाला भक्ष्य म्हणून गिळंकृत केल्याचा प्रकार निदर्शनास आला.
महिला सरपण आणण्यासाठी भरदुपारी टेकडीकडे चालली होती. काटेरी झुडपांच्या आडोशाला दोन नागांचे फुसफुसणे आणि त्यांची झुंज तिने पाहिली. तिने सर्पमित्र दिनकर चौगुले यांना हा प्रकार सांगितला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मात्र त्यांना एका मोठ्या साडेपाच फुटाच्या नागाने (कॉमन कोब्रा) दुसऱ्या साडेतीन फुटाच्या नागाला अर्धमेला करून गिळण्यास सुरुवात केली होती. नागाने दहा मिनिटात आपल्याच जातीचे भक्ष्य फस्त केले. त्यानंतर दिनकर चौगुले यांनी मोठ्या नागाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले होते. .
https://www.dailymotion.com/video/x8453rv
कॉमन कोब्राने (नाग) नागालाच गिळताना पाहिलेले नाही. डोंगरातील आगीच्या प्रकारामुळे मुख्य भक्ष्य जागा सोडून जात आहेत. आठ महिन्यांपूर्वी दहा फुटांचा अजगर अन्नाच्या शोधात लोकवस्तीत आला होता. त्यामुळे पर्यावरणातील अन्नसाखळी टिकवणे काळाची गरज आहे, हे विसरून चालणार नाही.
-दिनकर चौगुले, सर्पमित्र,
1- भारतात चार प्रकारचे कोब्रा आढळून येतात. यातील फक्त किंग कोब्रा इतर साप खातो. तर बाकीचे ब्लॅक कोब्रा, मोनोसिल्याटेड कोब्रा व कॉमन कोब्रा यांचे मुख्य भक्ष्य सरडे, बेडूक व उंदीर आहे. कॉमन कोब्रा भारतात सर्वत्र आढळतात.
2 - लोकांनी वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी चुकीच्या समजुतीमुळे डोंगर व जंगलांना आग लावणे थांबवावे. ग्लेडेशिया व आक्रेशिया-सारख्या परदेशी वंशांच्या झाडांजवळ लहान प्राणी व पक्षी जात नाहीत. कारण या झाडांच्या पानांच्या वासाने वन्यप्राणी बेशुद्ध होतात. त्यामुळे वनविभागाने वृक्ष लागवड करताना भारतीय वंशांचीच झाडे लावावीत, असे काही निसर्गमित्रांचे मत आहे.