VIDEO- जनावरांच्या खाद्यासाठी आता आझोला
By Admin | Published: February 7, 2017 05:47 PM2017-02-07T17:47:35+5:302017-02-07T17:47:35+5:30
ऑनलाइन लोकमत/निलेश शहाकार बुलडाणा, दि. 7 - जिल्ह्यात चा-याची संभाव्य कमतरता, पशुखाद्य, ढेप यांच्या वाढलेल्या किमतीमुळे दुभत्या जनावरांच्या खाद्याची ...
ऑनलाइन लोकमत/निलेश शहाकार
बुलडाणा, दि. 7 - जिल्ह्यात चा-याची संभाव्य कमतरता, पशुखाद्य, ढेप यांच्या वाढलेल्या किमतीमुळे दुभत्या जनावरांच्या खाद्याची समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून शेतक-यांच्या जनावरांना स्वस्त व सकस पशुखाद्य मिळावे, यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात प्रथमच आझोला जलशैवाळ खाद्याचा प्रयोग केला आहे. पश्चिम महाराष्ट्रानंतर हा विदर्भातील पहिलाच प्रयोग आहे.
शेतक-यांसाठी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय नेहमीच फायदेशीर असतो. मात्र दुधाळ जनावरांना पुरेसा पोषक आहार मिळत नाही. त्याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होवून दुधाची गुणवत्ता घसरते. त्यामुळे शेतक-यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नाही. शिवाय यामुळे शेतक-यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. हा उपाय म्हूणन जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून आझोला या शैवाळ खाद्याची निर्मिती करण्यात येत आहे. गत चार महिन्यापासून विभागाच्या कार्यालयात सदर प्रयोग सुरू आहे. शिवाय जिल्ह्यात हजारो शेतक-यांनी आपल्या दुधाळ जनावरांसाठी या आझोला शैवाळाचा लाभ घेतला आहे.
काय आहे आझोला
आझोला हे जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते शेवाळ आहे. यामध्ये प्रथिने, आवश्यक एमिनो, असिड्स, जीवनसत्वे (व्हिटॅमीन ए. बी आणि बिटाकेरोरिन), खनिजांसाठी जसे कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशिअम, लोह, तांबे, मॅग्नेशिअम आदी घटक मोठ्या प्रमाणात आहे. जे दुधाळ जनावरांसाठी आवश्यक आहे.
कशी होते लागवड
विटांनी तयार केलेल्या टाक्यांमध्ये प्लास्टिक शीट टाकली जाते. यात बारीक वाळू, माती टाकून त्यात शेणाचे स्लरी तयार करण्यात येते. यात विशिष्ट मिक्चर पाण्यात मिसळून टाक्यात टाकले जाते. यात मदर आझोला बी टाकण्यात येते. एक महिन्यानंतर प्रत्येक १० ते १५ दिवसानंतर ५००-६०० ग्राम आझोला प्राप्त होते. आझोला गहू व मका भरडा किंवा नुसतेचा जनावरांना खायला देता येतो.
दुधाळ जनावरांसाठी आझोला उपयुक्त आहे. चारा व इतर खाद्याच्या वाढत्या किमतीमुळे आझोला शेतक-यांच्या जनावरांसाठी स्वस्त व फायदेशीर आहे. याचा शेतक-यांनी लाभ द्यावा.
डॉ. ए. एल. खेरडे
सहा.आयुक्त पशुसंवर्धन,
बुलडाणा