VIDEO - `वाय-फाय शुभारंभात आर्चीसोबत बीडकर झिंगाट!
By admin | Published: August 6, 2016 03:29 PM2016-08-06T15:29:49+5:302016-08-06T15:41:17+5:30
येथील पालिकेच्या वतीने शनिवारी शहरवासियांसाठी मोफत वायफाय सुविधेचा प्रारंभ करण्यात आला.
Next
संजय तिपाले, ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 6 - येथील पालिकेच्या वतीने शनिवारी शहरवासियांसाठी मोफत वायफाय सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ‘सैराट’फेम रिंकू राजगुरू (आर्ची)ची प्रमुख उपस्थिती होती. तिची एक झलक पाहण्यासाठी तरुणाई अक्षरश: सैराट झाली होती.
शहरातील सिद्धीविनायक कॉम्लेक्स समोरील डीपीरोडवर हा सोहळा दुपारी बारा वाजता अभूतपूर्व उत्साहात पार पडला. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, नगराध्यक्षा डॉ. रत्नमाला दुधाळ, उपनगराध्यक्ष नसीमोद्दीन इनामदार यांच्यासह पालिकेचे सभापती, नगरसेवकांची उपस्थिती होती. संगणकावर ‘क्लिक’ करुन वायफाय सेवेचा प्रारंभ झाला.
यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, जग हे वैश्विक खेडे असून वायफायसारख्या सुविधेमुळे विद्यार्थी, तरुणांना जगाशी स्पर्धा करणे सुकर होणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरवासियांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर आहे. त्यासाठी पालिका कटीबद्ध असून मूलभूत सुविधांसोबत आता इंटरनेटसारखी सुविधा देण्यातही अग्रेसर आहे. आर्चीचा आदर्श घेऊन बीडच्या मुलींनीही नाट्य, कला क्षेत्रात पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, बीडमध्ये वायफाय सुविधा देण्यास व त्याच्या प्रारंभ कार्यक्रमास आर्चीला आणण्यास विरोध झाला; परंतु आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय आता पुढे जाता येणार नाही. त्यामुळे विरोध झुगारुन वायफाय सुविधा उपलब्ध केली. आर्चीकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. अतिशय कष्टातून तिने कमी वयात यश संपादन केले. बीडच्या तरुणाईपुढे आयकॉन असावा, त्यामुळे तिला खास बीडकरांच्या भेटीला आणल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विकासाला विरोध करणाºयांनी स्वत: एक तरी काम केले का? याचे उत्तर द्यावे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
मराठीत सांगितलेलं कळत नाही का...
अभिनेत्री रिंकू राजगुरु मंचावर अवतरताच उपस्थित तरुणांनी ‘आर्ची.. आर्ची... असा पुकार केला. त्यानंतर तिने हात उंचावून सर्वांना अभिवादन केले. यावेळी तिच्यासोबत सेल्फी घेऊन हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी बच्चेकंपनींसह तरुणाईची अक्षरश: उडी पडली होती. आर्चीची एक झलक डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी महिलांनीही लक्षणीय गर्दी केली होती. तिच्या भाषणाची सर्वांनाच उत्कंठा होती; परंतु तिने अवघ्या दोन मिनिटांचा संवाद साधला. ‘बीडकरांनो नमस्कार, असे म्हणत तिने संवादास सुरुवात केली. ती म्हणाली, वायफाय सुविधेचा उद्घाटनाला येता आले, याचा आनंद वाटला. खूप चांगला उपक्रम आहे, असे सांगून तिने बीडकरांना शुभेच्छाही दिल्या. जाताना ‘थँक यू’ म्हणायलाही ती विसरली नाही. शेवटी तिने ‘सैराट’मधील प्रसिद्ध डायलॉग सादर केला. ‘मराठीत सांगितलेलं कळत नाही, का इंग्लिशमध्ये सांगू’ असे म्हणत तिने निरोप घेतला. यावेळी तरुणार्इंनी एकच जल्लोष केला.