VIDEO - बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बळीराजा सज्ज!
By admin | Published: August 31, 2016 01:05 PM2016-08-31T13:05:03+5:302016-08-31T13:25:53+5:30
यावर्षी समाधानकारक पिके असल्याने शेतकरी राजा मोठया आनंदात बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करणा-या पोळा सणासाठी सज्ज झाला आहे
Next
नंदकिशोर नारे
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ३१ - बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा शेतक-यांचा महत्वाचा सण म्हणजे ‘पोळा’. दरवर्षी शेतक-यांवर कोसळणारे अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे शेतकरी पार खचलेला असतांना यावर्षी समाधानकारक पिके असल्याने शेतकरी राजा मोठया आनंदात बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करणा-या पोळा सणासाठी सज्ज झाला आहे. १ सप्टेंबर रोजी पोळा सणानिमित्त जिल्हयात बैलांचा साज विक्रेत्यांनी मोठया प्रमाणात दुकाने थाटली आहेत, यावर्षी अनेक भागातील पीक परिस्थिती उत्तम असल्याने जिल्हयात बैलांचा साज विक्रेत्त्यांच्या दुकानांवर मोठया प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. जिल्हयातील वाशिम शहरामध्ये १५, मालेगावशहरात ७, मानोरा शहरात ६, कारंजा शहरात १०, रिसोड व मंगरुळपीर प्रत्येक ६ बैलांच्या साज विक्रेत्यांची दुकाने लागली आहेत. मानोरा तालुक्यातील पीक परिस्थिती उत्तम नसल्याने येथे पोळा सणानिमित्त पाहिजे तसा उत्साह दिसून येत नसल्याचे चित्र आहे. या व्यतिरिकत जिल्हयातीलच मोठया बाजारपेठ असलेल्या शेलुबाजार, अनसिंग सारख्या ठिकाणीही काही प्रमाणात दुकाने थाटली आहेत.
बैलाचा साज महागला
पोळानिमित्त विक्रीस आलेल्या बैलांचा साजाचे ही भाव गगनाला भिडल्याने अनेक गरीब शेतकºयांनी जुनाच साज बैलावर चढवून नविन खरेदीकडे पाठ फिरविली तर सदन कास्तकार खरेदीसाठी मात्र गर्दी करतांना दिसून येत आहेत. सुताचे दर वाढलने व इतरही वस्तूचे भाव वाढल्याने बैलाचा साज महागल्याचे एका व्यापा-याने सांगितले.