VIDEO - विहिरीत पडलेल्या बिबटाला मिळाले जीवदान
By admin | Published: August 18, 2016 04:08 PM2016-08-18T16:08:20+5:302016-08-18T17:27:13+5:30
बार्शिटाकळी तालुक्यातील चिंचोळी वरखेड गावालगतच्या नाल्याकाठी असलेल्या शेतशिवारातील विहिरीत मध्यरात्री बिबट पडले
- राम देशपांडे
अकोला, दि. 18 : बार्शिटाकळी तालुक्यातील चिंचोळी वरखेड गावालगतच्या नाल्याकाठी असलेल्या शेतशिवारातील विहिरीत मध्यरात्री बिबट पडले. धारदार दातांच्या आधारे विहिरीतील लोखंडी सळी पकडून असलेल्या या बिबटाला सकाळी ९.१५ च्या सुमारास बाहेर काढण्यात वनविभागाचे अधिकारी व बचाव पथकातील सहकार्यांना यश आले.
बार्शिटाकळी तालुक्यातील चिंचोळी वरखेड हे गाव काटेपूर्णा अभयारण्याच्या सीमेवर आहे. गावालतच्या नाल्याकाठी सरपंच आधंळे यांच्या शेतातील विहिरीत बुधवार व गुरूवारच्या मध्यरात्री बिबट पडले असल्याची माहिती गावातील लोकांना कळली. पहाटे ६ च्या सुमारास सरपंच आंधळे यांनी ही बाब वनविभागाच्या अधिकार्यांना दिली. माहिती मिळताच वपरिक्षेत्र अधिकारी अशोक वायाळ यांनी बचाव पथकासह घटनास्थळ गाठले. विहिरीला संरक्षित भिंत वा कुठलेही आवरण नसल्याने, विहिरीत पडलेले २.५ ते ३ वर्षांचे हे बिबट आपल्या धारदार दातांच्या आधारे लोखंडी सळी पकडून होते.
बार्शिटाकळीचे वनपाल शेख हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. वन अधिकार्यांच्या नेतृत्वात बचाव पथकातील वनरक्षक सुनील राऊत, निलेश सोनोने, सिद्धार्थ जोंधळे, सर्पमित्र मुन्ना उर्फ शे. मोहम्मद व अनील चौधरी यांनी चोहू बाजूने दोर बांधलेली खाट विहिरीत सोडली. महतप्रयासानंतर ९.१५ च्या सुमारास खाटेच्या आधारे विहिरीतून बाहेर पडलेल्या बिबटाने अभयारण्याच्या दिशेने धूम ठोकली. घटनास्थणी ग्रमस्थांनी गर्दी केली होती. विहिरीत पडलेले बिबट पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीला पांगविण्यासाठी वनविभागाच्या चमूला वेगळे परिश्रम घ्यावे लागले.
काटेपूर्णा आणि मेळघाट अभयारण्यालगतच्या शेतशिवारांमधील बहुतांश विहिरींना संरक्ष भिंती नसल्याने जंगलातील श्वापदे त्यात पडत असून, या विहिरीच जंगलातील राजाची शिकार करीत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने जागतिक व्याघ्र दिनी प्रकाशित केले होते. त्यानंतरही शेतकरी व वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने जंगली श्वापदे त्यात पडत असल्याचे हे ताजे उदारहण म्हणावे लागेल.
----
अभयारण्यालगतच्या शेतशिवारांमधी बहुतांश विहिरींना संरक्षित भिंती नाहीत. त्यावर आवरण देखील टाकले जात नाही. परिणामी, तहान व भूक भागविण्यासाठी लगतच्या शेतशिवारांमध्ये फिरणार्या जंगलातील श्वापदांना जीव गमवावा लागतो. शेतकर्यांनी अशा विहिरींना संरक्षित कठडे व आवारण घालावेत.
- अशोक वायाळ
वनपरिक्षेत्र अधिकारी, काटेपूर्णा