भाजपा नगरसेविकेचा शिवसेना महिला पदाधिकारीस अश्लील शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 16:38 IST2021-06-19T16:37:50+5:302021-06-19T16:38:37+5:30
भाजपच्या स्थानिक नगरसेविकेने शिवसेना महिला उपशहर संघटक यांना अश्लील अपशब्द व शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे.

भाजपा नगरसेविकेचा शिवसेना महिला पदाधिकारीस अश्लील शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड: भाईंदर पश्चिमेस मुर्धा रेव आगर भागात महापालिकेच्यावतीने केल्या जाणाऱ्या कीटक नाशक फवारणीच्या श्रेयावरून भाजपच्या स्थानिक नगरसेविकेने शिवसेना महिला उपशहर संघटक यांना अश्लील अपशब्द व शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे.
राई गावात राहणाऱ्या शिवसेना महिला उपशहर संघटक तेजस्वी पाटील यांनी पावसाळा सुरू झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून राई, मुर्धा, मोरवा भागात कीटकनाशक फवारणी करण्याची विनंती पत्राद्वारे महापालिकेसह आमदार गीता जैन यांना केली होती.
शुक्रवारी मुर्धा रेव आगर झोपडपट्टीत पालिकेने कीटकनाशक फवारणी सुरू केली असता, तेजस्वी ह्या सुद्धा तिकडे उपस्थित होत्या. सदर प्रकार नगरसेविका नयना यांना कळताच त्यांनी जोरदार भांडण करत तेजस्वी यांना अश्लील अपशब्द वापरत शिवीगाळ केली. मी इकडची नगरसेविका आहे, तुझे इथे काय काम आदी मोठ्याने आरडाओरडा करत विचारणा केली. नयना यांनी अगदी लायकी, बाप सुद्धा काढला.
तोच शनिवारी राई गावात कीटकनाशके फवारणीच्या कामाचा व्हिडीओ समाज माध्यमावर लाईव्ह केला म्हणून स्थानिक भाजपा नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी तेजस्वी यांना जाब विचारला. त्यावेळी सुद्धा विनोद व तेजस्वी यांच्यात चांगलाच वादंग झाला. हा वाद तर थेट फेसबुकवर लाईव्ह झाल्याने त्यावर सुद्धा चांगलीच चर्चा रंगली.