VIDEO - कारवीचे रानफूल, दाजीपुरात निळी भूल

By Admin | Published: October 18, 2016 08:31 PM2016-10-18T20:31:31+5:302016-10-18T20:31:31+5:30

राधानगरी, सावराईचा सडा, राऊतवाडी, कारिवडे, शिवाची वाडी, दिगस, दाजीपूर, उगवाई मंदिर अशा या २२ किलोमीटर परिसरातील नागमोडी रस्त्यांच्या दुतर्फा पसरलेला

VIDEO - Carmichael Flies, Dijipore Blue Dry | VIDEO - कारवीचे रानफूल, दाजीपुरात निळी भूल

VIDEO - कारवीचे रानफूल, दाजीपुरात निळी भूल

googlenewsNext
>- संदीप आडनाईक/आदित्य वेल्हाळ
 
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 18 - राधानगरी, सावराईचा सडा, राऊतवाडी, कारिवडे, शिवाची वाडी, दिगस, दाजीपूर, उगवाई मंदिर अशा या २२ किलोमीटर परिसरातील नागमोडी रस्त्यांच्या दुतर्फा पसरलेला कारवीच्या फुलांचा गालिचा भान हरपून टाकतो आहे. 
पश्चिम घाटातील कातळावर फुललेला हा कारवीचा वायुतुरा पर्यटकांना निळी रानभूल घालत आहे. सप्टेंबरच्या दुस-या आठवड्यापासून फुललेला हा निळा महोत्सव आता अखेरच्या हंगामात आहे. दाट धुक्याच्या दुलईमध्ये निसर्गाने मुक्तहस्ताने उधळलेली ही रानफुले आता पुन्हा सात वर्षांनीच फुलणार आहेत.
जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या राधानगरी व दाजीपूरच्या अभयारण्याचा हा परिसर पर्यटकांना आकृष्ट करणारा आहे. ३५१ चौरस किलोमीटरचा हा जंगलपट्टा जगातील ३४ अतिसंवेदनशील ठिकाणांपैकी एक आहे. निमसदाहरित जंगल प्रकारातील या पश्चिम घाटावरील कातळावर ही कारवीची निळी मनमोहक फुले (शास्त्रीय नाव- कार्विया कुलोसा) केवळ हौशी पर्यटक, वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकारांसाठी पर्वणीच ठरली आहेत. 
समुद्रसपाटीपासून सरासरी १०० फूट उंचीवर असलेल्या राधानगरीच्या अभयारण्याचा दाजीपूर ते सावराई सडा हा २२ किलोमीटरचा एक भाग आहे. राधानगरी आणि काळम्मावाडी धरणांचा भोवताल हा तेथील गवा, वाघ, बिबळ्या, पिसोरी, सांबर, विविध पक्षी, पाली, सरडे, साप, बेडूक, देवगांडूळ, फुलपाखरे यासाठी जसा प्रसिद्ध आहे, तसाच या घनदाट जंगलातील डोंगरमाथ्यावरील जांभा कातळ्याच्या मोठ्या सड्यावरील विविध वनस्पती संपदेसाठीही प्रसिद्ध आहे. या परिसरात १५०० पेक्षा जास्त फुलझाडांच्या प्रजाती आढळतात. भारतीय द्वीपकल्पातील प्रादेशिक अशा २०० प्रजाती येथे आहेत. हे अभयारण्य ३०० पेक्षा जास्त औषधी वनस्पतींचे जणू भांडारच आहे! कारवीशिवाय येथे करवंदे, निरगुडी, आडुळसा, तोरण, शिकेकाई, रानमिरी, मुरुड शेंग, वाघाटी, सर्पगंधा, धायरी अशी विविध झुडपे व वेलीही मोठ्या प्रमाणात आहेत.
कासच्या पुष्पपठाराइतकी लोकप्रियता नसल्याने दाजीपूरचा हा रानफुलांचा महोत्सव सुदैवाने अजूनही अस्पर्शित आहे, ही वनस्पतीसंवर्धनासाठी चांगलीच बाब असल्याचे पर्यावरणप्रेमी मानतात. यामुळे अनेक अज्ञात वनस्पतींचे संशोधन करण्यासाठी संशोधकांना येथे संधी मिळत आहे.

Web Title: VIDEO - Carmichael Flies, Dijipore Blue Dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.