VIDEO - आजच्या पिढीला भावणारी संतवाणी
By admin | Published: July 4, 2017 11:04 AM2017-07-04T11:04:35+5:302017-07-04T18:35:36+5:30
आज आषाढी एकादशीचे निमित्त साधून लोकमतने नव्या रंगात आणि अस्सल भारतीय मातीच्या गंधात संतवाणी सादर केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नव्या पिढीला अर्थात जेननेक्स्टला भक्तिरंगाशी जोडण्यासाठी आज आषाढी एकादशीचे निमित्त साधून लोकमतने नव्या रंगात आणि अस्सल भारतीय मातीच्या गंधात संतवाणी सादर केली आहे. कित्येक शतके असं ज्यांचं वय ते अभंग आजही भावतात, भिडतात, त्यांना संगीतात गुंफण्यासाठी आतूर करतात. विठ्ठलाच्या कानी ते नव्या रूपात अर्पण करावेत या एकमेव इच्छेने लोकमत सादर करत आहे ही आजची संतवाणी! भारतीय डिजिटल पार्टी अर्थात भाडिपाच्या सहकार्याने. अभंगवाणीचे व्हिडिओतून साकारलेले हे नवे रसरशीत रुप तरुणाईच्या मनाला भिडले आहे.
टाळ-मृदुंग आणि वीणेच्या पारंपरिक साजाला गिटार आणि की बोर्डची आधुनिक जोड देत लोकसंगीत व फ्यूजनचा नवा आविष्कार अभंगवाणीच्या बाबतीत लोकमतने पेश केला आहे. देवळाच्या गाभा-यात किंवा वारीत घुमणारे संतवाणीचे सूर नव्या साजात स्टुडिओत आणण्याचे लोकमतचे हे पाऊल तरुणाईला भावले आहे. तसे पाहिले तर गाभा-यातील संतवाणी बालगंधर्वांच्या जोहार मायबापनं नाट्यगृहात आणली. पं. भीमसेन जोशी, किशोरीताई आमोणकर यांनी त्याला वेगळ्या सांगितिक-सांस्कृतिक उंचीवर नेऊन ठेवले. हा पाया आणखी विस्तारताना अभंगवाणी नव्या पिढीपर्यंत आगळ्या रुपात नेण्याचा हा प्रयोग लोकमतनं जाणीवपूर्वक साकारला आहे.
इथल्या मातीचा गंध असलेले लोकसंगीत आणि रॉक-पॉपसारखे आधुनिक जागतिक संगीत यांचा मिलाफ करणारी हृषिकेश, सौरभ आणि जसराज या त्रिकुटाची भन्नाट अदा, सुफी आणि मेवाडी थाटातील संगीताचा हा आध्यात्मिक आविष्कार जेननेक्स्टच्या मनाचा ठाव घेऊ लागला आहे.
संतांचे अभंग ऐकताना अनेकजण तल्लीन होऊन जातात. बसल्याजागी अनेकांची समाधी लागते. कीर्तनकार आयुष्याचं सार सांगणारे हे अभंग कथन करतात त्यावेळी हे अभंग मनाचा कधी ठाव घेतात ते समजत नाही. समाजप्रबोधन करणारे हेच अभंग सध्या संगीताच्या माध्यमातून नव्याने लोकांसमोर मांडण्यात येत आहेत.
आजच्या आधुनिक संगीताशी सांगड घालून सादर झालेला हे अभंग तरुणपिढीला भावतात. या प्रयत्नामुळे आजची तरुणाई अभंगाशी जोडली जात असून अभंगामागचा अर्थ समजावून घेण्याची त्यांची जिज्ञासा वाढत चालली आहे. म्हणूनच आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने लोकमत नव्या स्वरुपात सादर करत आहे ही आजची संतवाणी!
पुंडलीक वरदे हरी विट्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय!!
ज्याला अभंग जसा भावतो
त्याला विट्ठल तसा सापडतो
संतवाणी ही कालातीत असल्याचा हा पुरावा आहे. संतवाणीचे पावित्र्य टिकवून त्याला वर्तमानाशी जोडणारा नवा आयाम देण्याचा प्रयोग लोकमतने केला आहे. त्याचे स्वागत होईल, याची मला पूर्ण खात्री आहे. तोच जुना अजरामर आशय नवा सूर, नवी लय घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे. बदलाकडे पाहण्याची नजर बदलल्याचे हे प्रतीक आहे. भाव तेथे देव याची प्रचीती आषाढी एकादशीच्या निमित्ताने या प्रयोगातून नक्कीच आली आहे.
- राजेंद्र दर्डा, एडिटर इन चीफ, लोकमत