VIDEO : ‘चुलीवरच्या भाकरी’नं दिला ४ हजार महिलांना रोजगार!

By Admin | Published: September 22, 2016 08:52 AM2016-09-22T08:52:00+5:302016-09-22T08:53:01+5:30

पुन्हा एकदा घरच्या चुलीवरच्या भाकरीची क्रेझ सुरू झाली असून त्यामुळे हजारो महिलांना रोजगार मिळाला आहे.

VIDEO: 'Chaliwar Bach' offers 4 thousand women jobs! | VIDEO : ‘चुलीवरच्या भाकरी’नं दिला ४ हजार महिलांना रोजगार!

VIDEO : ‘चुलीवरच्या भाकरी’नं दिला ४ हजार महिलांना रोजगार!

googlenewsNext

सचिन जवळकोटे, आॅनलाईन लोकमत

सातारा, दि. २२ -  ‘घरकी मुर्गी दाल बराबर’ असं म्हणत पूर्वीच्या काळी मंडळी पंजाबी डिशेसची चव चाखायला हॉटेलात जायची. काळ बदलला. टेस्ट बदलली. आता पुन्हा एकदा घरच्या चुलीवरच्या भाकरीची क्रेझ सुरू झालीय. अस्सल गावरान खर्डा- भाकरी जेवणाचा फर्डाऽऽ बेत गावोगावच्या ढाब्यांवर रंगू लागलाय. यामुळं ‘तंदूर रोटी’ला किती फटका बसला माहीत नाही; परंतु हजारो महिलांच्या हातांना मात्र कायमस्वरुपी काम मिळालंय. होय. केवळ सातारा जिल्ह्यातच एक नव्हे दोन नव्हे तब्बल चार हजार माता-भगिनींना या खरपूस भाकरीमुळं भरघोस रोजगार मिळालाय.
आज पावेतो ‘भाकरीचा चंद्र’ साहित्यात चमकला. ‘आधी हाताला चटके देणारी भाकर’ही बहिणाबार्इंच्या कवितेतून प्रकटली. ‘चतकोर भाकरी'चं उद्रेकी काव्यही उपाशी पोटी जन्माला आलं. ‘न फिरवल्यामुळे भाकरी कशी करपते,’ हे बारामतीकरांच्या भाषणातून सत्ता बदलापूर्वी राजकीय तज्ज्ञांना अनेकवेळा समजलं; पंरतु प्रत्यक्ष जीवनातून मात्र ही भाकरी हद्दपार होत गेली. ‘इस्टंट पोळी’च्या युगात ‘पिठाची बडवा-बडवी’ पुरती कालबाह्य झाली. अशातच मराठी खवय्याला ‘पंजाबी डिशेस’ अन् ‘गुजराथी थाळी’ची ओढ लागली. गेल्या दोन-तीन दशकात ‘नॉर्थ अन् साऊथ इंडियन टेस्ट’नं हॉटेलच्या काऊंटरवर अधिराज्य केलं.
मात्र गेल्या काही वर्षापासून ही टेस्ट पुन्हा झपाट्यानं बदलत गेलीय. ‘भाकरी कशाशी खातात,’ हे माहीत नसणारी नवीन पिढी अस्सल गावरान जेवण अनुभवण्यासाठी आसुसलीय, हे ओळखून गावोगावच्या ढाब्यांवर ‘तंदूर भट्टी’ नजीकच ‘मराठमोळी  चूल’ मोठ्या कौतुकानं बांधली गेलीय. सातारा जिल्हा तर पर्यटनाचा बालेकिल्ला. महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड, तापोळा, कास पठार अन् कोयना धरणासह असंख्य पर्यटनस्थळं हजारो पर्यटकांनी गजबजून गेलली. या पट्टयात वळणावळणावर ढाबे अन् हॉटेल्सची संख्या चिक्कार. खवय्यांची गर्दीही तुडुंब.
  ‘पुणे-बेंगलोर हायवे’वर तर जागोजागी हॉटेल्सच्या फलकांची जाहिरातबाजी; पण यातल्या बहुसंख्य होर्डिंग्जवर एखाद्या हिरोईनच्या थाटात एका आज्जीबाईचा भलामोठ्ठा फोटो. 'कॅतरीनाचा कैफ'ही कमी पडावा... 'करिनाची क्रेझ'ही कमी वाटावी, अशा पोझमध्ये फ्लेक्सवर झळकणारी ही आज्जीबाई चक्क चुलीच्या धुरात भाकऱ्या थापताना दिसते. 'फूड मॉल'च्या पब्लिसिटीसाठी इरकल साडीतल्या सर्वसामान्य खेडवळ बाईचा वापर होण्याची ही अजब घटना म्हणजे बदलत्या युगाची नांदीच !
  विशेष म्हणजे, अशा आजीबाईसारख्याच हजारो महिला आजकाल प्रत्यक्षात ढाबा-ढाब्यांवर भाकरी थापताना दिसताहेत. वाईतील एका ढाब्यावरच्या किचनमध्ये भाकरी बडविणारी गौराबाई सांगत होती, ‘येका तासामंदी म्या तीस भाकऱ्या बडवित्ये; पण भाईरुन म्हंजी मालकाच्या काऊंटरवरनं मोठी आर्डर आली तर मातूर माजा स्पीड वाढतूया. येका टायमाला शंभर-शंभर भाकऱ्याबी बडवुनशान म्या दिल्याती.’ बोलताना गौराबाईचा हात सराईतपणे पिठाच्या गोळ्यावरून झरझर फिरत होता. एकाचवेळी एकीकडं भाकरी थापणं तर दुसरीकडं तव्यावर भाजणं, असा ‘टू इन वन’ प्रोग्राम व्यवस्थितपणे सुरू होता.


  साताऱ्यातील हॉटेल चालक तुषांत माने यांनी दिलेली माहिती तर आश्चर्यकारकच होती, ‘पूर्वी दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर उन्हातान्हात मजुरी करणाऱ्या महिलांना आता या भाकरीमुळं बसल्याजागी चांगलाच रोजगार मिळालाय. महिन्याकाठी पाच ते सहा हजार रुपयांचा पगार मिळतोय. पुन्हा वर हक्काची साप्ताहिक सुट्टी. दिवसभरात आठ तास काम केलं की थेट घरी.’
  पूर्वी ‘पंजाबी डिश’ संस्कृतीत ‘वस्ताद’ या पुरुषी व्यक्तीमत्वावरच हॉटेलिंगचा व्यवसाय अवलंबून असायचा; परंतु चुलीवरच्या भाकरीचं 'धूम्र युग' परत अवतरल्यानंतर आतल्या भट्ट्यांवर आता ताई-माई-आक्का यांची पुन्हा वर्दळ वाढलीय. सातारा जिल्ह्यातील किमान दीड हजार हॉटेल्स्मध्ये आज भाकऱ्या भाजणाऱ्या महिलांना रोजचा रोजगार मिळालाय. या महिलांची संख्या थोडीथोडकी नव्हे तर चार हजारांच्या आसपास पोहोचलीय. यातल्या बहुतांश अशिक्षित अन् वयस्कर, तरीही भाकऱ्या थापण्याच्या ‘स्कील मॅनेजमेंट’मध्ये माहीर.
 .. तर अशी ही भाकरी. कुणाला बाजरीची आवडते तर कुणाला नाचणीची. तरीही खरी भाकरी ही ज्वारीचीच. भाकरी खरं तर गॅसवरही तयार होऊ शकणारी; परंतु धगधगत्या चुलीवरच्या गरमागरम तव्यावर भाजली जाणारी भाकरी काही औरच. तिचा खरपूस वास नाकात शिरल्यानंतरही भूक नाही लागली तर आई शपथ. भाकरी थापण्याचंही एक खास तंत्र असतं. चारही बाजूनं बड-बडवून गोलाकार बनल्यानंतर भाकरी तव्यावर पडते, तेव्हा त्याला नेमकं पाणी लावण्याचंही ‘टायमिंग’ जमायला हवं. भाकरी जेवढी पातळ होईल, तेवढी टम्म फुगण्याचे चान्सेस अधिक़ त्यात पुन्हा ती सतत फिरवायलाही हवी, नाहीतर करपलीच समजा. मात्र अनेकांना ही करपलेली भाकरीही खूप आवडते बरं का. तर मग मंडळी.. कधी निघणार बाहेर? अस्सल चुलीवरची खर्डा-भाकरी खायला?

(लेखक ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)

Web Title: VIDEO: 'Chaliwar Bach' offers 4 thousand women jobs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.