VIDEO : ट्रक आणि घरावर कोसळलं मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर
By admin | Published: May 25, 2017 01:52 PM2017-05-25T13:52:13+5:302017-05-25T14:06:03+5:30
रस्त्यावरील वीज खांबांवरील तारांना हेलिकॉप्टरचे पंखे अडकले आणि काही क्षणातच म्हाडा झोपडपट्टीत असलेल्या रस्त्यावरील वीज डीपी व ट्रकच्या मध्यभागी हेलिकॉप्टर कोसळले
Next
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 25 - निलंग्याहून मुंबईकडे येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कोसळले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असलेले पाचही जण सुरक्षित आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. उड्डाण भरताच हेलिकॉप्टर हेलिपॅडवरच कोसळलं. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरक्षित आहेत.
शिवाजी विद्यालय शाळेच्या मैदानातून उड्डाणानंतर 50 फुटांवर असताना, एका मिनिटाच्या आतच हेलिकॉप्टर कोसळलं. चॉपर फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
रस्त्यावरील वीज खांबांवरील तारांना हेलिकॉप्टरचे पंखे अडकले आणि काही क्षणातच म्हाडा झोपडपट्टीत असलेल्या रस्त्यावरील वीज डीपी व ट्रकच्या मध्यभागी हेलिकॉप्टर कोसळले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, केतन पाठक, प्रधान सचिव प्रवीण परदेशी आणि दोन क्रू मेंबर हेलिकॉप्टरमध्ये होते. हे सर्व जण सुखरुप आहेत. दरम्यान, या अपघातामुळे भरत कांबळे या स्थानिकाच्या घराच्या भिंती पडल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा पंखा वीजेच्या खांबाला धडकल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. मुख्यमंत्री सध्या लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरी आहेत.
अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेचच ट्विटरच्या माध्यमातून आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली. ""मी आणि माझी टीम संपूर्णतः सुरक्षित आहे. कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही", असं ट्विट त्यांनी केलं. तसंच यानंतर व्हिडीओच्या माध्यमातून ""माझ्या पाठिशी महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद. काही काळजीचं कारण नाही, मी सुखरुप आहे", अशी प्रतिक्रियादेखील दिली.
"आम्हाला कोणाला काहीच झालेलं नाही. मला तर काहीच इजा झालेली नाही. डॉक्टरांनी तपासणी केली आहे. सुगर, ब्लड प्रेशर सगळं व्यवस्थित आहे. ईश्वराची कृपा आणि महाराष्ट्रातील 11 कोटी 20 लाख लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मी सुखरुप आहे. काळजी करण्याचं कारण नाही", असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
नागरी हवाई उड्डाण संचालनालयाने देखील अपघाताची माहिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरने दुपारी 12 वाजता उड्डाण केलं. पण वाऱ्याचा बदलता दाब लक्षात आल्याने वैमानिकाने लॅण्डिंग करण्याचं ठरवलं. पण यादरम्यान, हेलिकॉप्टरचा पंखा वीजेच्या खांबांच्या तारांमध्ये अडकलं. यामुळे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. चॉपरमधील सर्वजण सुखरुप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, अशी माहिती नागरी हवाई उड्डाण संचालनालयाने दिली.
हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन विचारपूस केली. "मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी सुरक्षित असल्याचं समजल्यानंतर मोठा दिलासा मिळाला. लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेशी तडजोड नको", अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.