VIDEO - शेरेबाजी केल्याच्या रागातून तरुणाला चोप

By admin | Published: April 15, 2017 02:21 AM2017-04-15T02:21:34+5:302017-04-15T14:46:14+5:30

‘तुझी बायको त्या .... सोबत फिरते’ अशा दीड वर्षापूर्वी पत्नीवर केलेल्या शेरेबाजीच्या रागातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला खोलीत बंद केले. तेथे त्याला विवस्त्र

VIDEO - Chuck the rug from the youth to the youth | VIDEO - शेरेबाजी केल्याच्या रागातून तरुणाला चोप

VIDEO - शेरेबाजी केल्याच्या रागातून तरुणाला चोप

Next

मुंबई : ‘तुझी बायको त्या .... सोबत फिरते’ अशा दीड वर्षापूर्वी पत्नीवर केलेल्या शेरेबाजीच्या रागातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला खोलीत बंद केले. तेथे त्याला विवस्त्र करून लाथाबुक्क्यांनी, सिगारेटचे चटके देत तब्बल पाच तास मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता विवस्त्र मारहाणीचा व्हिडीओ मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पसरविल्याची धक्कादायक घटना विक्रोळीत उघडकीस आली आहे. यात सेना गटप्रमुखासह सहा जणांचा समावेश आहे. दबावापोटी पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांच्या संतापानंतर पोलिसांनी फक्त मारहाणीचा गुन्हा दाखल करून हात वर केल्याचा आरोप नातेवाईक करीत आहेत.
विक्रोळीच्या हरियाली व्हिलेज परिसरात तक्रारदार ३८ वर्षीय आकाश (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहतो. त्याच परिसरात त्याचा जेंट्स टेलरचा व्यवसाय आहे. दीड वर्षापूर्वी मित्रांमध्ये मस्ती सुरू असताना त्याने कमलेश शेट्टीच्या पत्नीविरुद्ध कमेंट्स पास केली. बुधवारी दुपारी कमलेशची मित्र सचिन चौरे, जयेश गुलाब कांबळे, कालू मनी शेट्टी, सूरज गायकवाड आणि आणखी एका मित्रासोबत राहत्या घरी दारूपार्टी सुरू होती. याचदरम्यान त्याला दीड वर्षांपूर्वी आकाशने पत्नीवर केलेली शेरेबाजी आठवली. त्याने आकाशला धडा शिकविण्यासाठी घरी बोलावून घेण्याचे ठरविले. त्याच्या सांगण्यावरून चौरे बुधवारी दुपारी आकाशच्या घरी गेला. चौरेचाही टेलरिंंगचा व्यवसाय आहे. टेलरिंगच्या कामानिमित्त कमलेशने घरी बोलावल्याचे सांगून तो आकाशसह कमलेशच्या घरी आला. सुरुवातीला त्याला दारू पाजण्यात आली. त्यानंतर सहाही जणांनी लाथा-बुक्क्यांसह पट्ट्यांनी मारहाण केली. त्यातील काही जणांनी त्याला सिगारेटचे चटकेही दिले. दुपारी साडे तीनपासून सुरू असलेली मारहाण रात्री ८ वाजता थांबली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी त्याचा व्हिडीओ मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅपसह सोशल मीडियावर पसरविला.
मारहाणीनंतर त्यांच्या तावडीतून सुटका होताच आकाशने घर गाठले. कुणाशीही काहीही न बोलता तो घरी येऊन झोपी गेला. कुटुंबीयांनी त्याच्याकडे विचारपूस केली. मात्र त्याने कुणाला काहीच सांगितले नाही. गुरुवारी व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत असलेला व्हिडीओ आकाशच्या लहान भावाच्या मोबाइलवर आला. त्यातील विकृती पाहून त्यालाही धक्का बसला. तेव्हा त्याने भावाला विश्वासात घेतल्यानंतर आकाशने घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी त्याच्यासोबत पोलीस ठाणे गाठले.
मात्र दबाबावापोटी विक्रोळी पोलिसांनी किरकोळ मारहाण झाल्याचे सांगून अदखलपात्र
गुन्ह्याची नोंद करून त्यांना घरी धाडल्याचे त्याच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कमलेश शेट्टी, सचिन चौरे, जयेश गुलाब कांबळे, कालू मनी शेट्टी यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा
दाखल करून हात वर केले. अपहरण, विवस्त्र करून मारहाण, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून बदनामी याबाबत पोलिसांनी कसलीच नोंद केली नसल्याचे
त्याचा मित्र अश्विन भागवत याने सांगितले. त्यांना मारहाणीचे व्हिडीओही दाखविण्यात आले असताना पोलीस गप्प करत असल्याचा आरोप आकाशच्या कुटुंबीयांनी केला आहे. (प्रतिनिधी)

कुटुंबीयांना धमकी
आकाशच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी काळू शेट्टीने त्यांना धमकी देत शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्याच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. मात्र जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.

सेना गटप्रमुखाचे नाव वगळले
मारहाणीच्या व्हिडीओमध्ये विक्रोळीत शिवसेनेच्या गटप्रमुख पदावर असलेल्या सूरज गायकवाडसह सहा जण आहेत. तरीदेखील पोलिसांनी गायकवाडचे नाव वगळून अन्य ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर सेनेच्या कार्यकर्त्यांकडून प्रकरण दाबण्यासाठी त्यांना सेटलमेंटची आॅफर देण्यात आल्याचे आकाशचा भाऊ टोनीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

व्हिडीओबाबत तपास सुरू
तक्रारदाराने दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील व्हिडीओची तपासणी करत आहोत, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
- सचिन पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ७

Web Title: VIDEO - Chuck the rug from the youth to the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.