VIDEO : टाळी वाजविणार नाही; आम्हाला काम द्या

By admin | Published: August 11, 2016 08:13 PM2016-08-11T20:13:41+5:302016-08-11T20:53:40+5:30

घरच्यांनी हाकलून दिलं, समाजाने स्वीकारलं नाही. काम करायची इच्छा आहे. आम्ही सफाई कामगारांच कामही करू. पण ते देखील मिळत नाही. म्हणून नाईलाजाने भिक मागावी लागते.

VIDEO: The clerk will not play; Let us work | VIDEO : टाळी वाजविणार नाही; आम्हाला काम द्या

VIDEO : टाळी वाजविणार नाही; आम्हाला काम द्या

Next
- प्राची मानकर
 
पुणे, दि. 11 -  घरच्यांनी हाकलून दिलं, समाजाने स्वीकारलं नाही. काम करायची इच्छा आहे. आम्ही सफाई कामगारांच कामही करू. पण ते देखील मिळत नाही. म्हणून नाईलाजाने भिक मागावी लागते. आम्हाला काम द्या, टाळी वाजविणार नाही, अशी भावना तृतीयपंथीयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृतीयपंथीयांना न्याय हक्क द्या, त्यांनाही माणूस म्हणून वागवा. शासकीय पातळीवरूनच त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला, असे आवाहन केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील तृतीयपंथीयांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील तृतीयपंथीयांशी संवाद साधला असता निसर्गाने घोर अन्याय केलाच, पण त्यापेक्षा समाज त्यांना दररोज मरणयातनाच देतो, असे दिसून आले. 
येरवडा परिसरातील आप्पा पुजारी यांनी तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी भांडायला सुरूवात केली आहे. पण त्यांची दखल कोणी घेत नाही. आम्हालाही इतरांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. पण अज्ञानाच्या गर्तेत आमचे लोक आहे. समाजाकडून क्रूर वागणूक मिळते. शासकीय पातळीवरही आमच्याबाबत अनास्थाच दिसते, असे आप्पा आणि त्याच्या सहकाºयांनी सांगितले. 
आप्पा म्हणाला, ‘‘  मला लहानपणापासून मुलींच्या सारखे बोलायला आवडायचे. त्यांच्यात बसायला आवडायचे. आई-वडीलांना सुरुवातीला काही वाटायचे नाही नंतर-नंतर त्यांना याचा राग यायला लागला. त्यामुळे मला मारायला लागले.  मुलांच्या चिडविण्याला कंटाळून शाळाही सोडावी लागली.  माझ्यामुळे सगळ्या नातेवाईकांनी घरच्यांशी संपर्क तोडला. त्यामुळे घरच्यांची चिडचिड व्हायला लागली. त्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षी मी घर सोडून निघून मुंबईला गेले. तेथेही दुसºया कोणी नाही तर आमच्या लोकांनीच जवळ केले. राहायची, जेवायची व्यवस्था केली.  आम्ही सगळयाजणी पैसे मागायला जायचो आणि त्या पैंशावरती आमचा उदरनिर्वाह करायचो. १५ वर्षानंतर मी जेव्हा पुण्यात आले आणि माझ्या घरी राहायला लागले. पुण्यात आल्यावर काम मागायला गेले असता  तु काय काम करणार असे सांगून हाकलून लावण्यात आले. अशीच सगळीकडे मिळाली.  त्यामुळे मी  आता काम मागणेच सोडले आणि पैसे मागायला सुरुवात केली.  माझी फक्त एकच मागणी आहे की, समाजाने आम्हाला स्वीकारावे.’’
मोनिकाची कहाणी तर खूप वेगळी. मुळची हैद्राबादची असलेली मोनिका दहावीपर्यंत शिकली आहे. मोनिका म्हणाली, ‘‘ शिक्षणाची आवड होती, पण शाळेतील सवंगड्यांकडून क्रुरतेचा अनुभव आला. त्यामुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही.  मुलीसारखे राहत असल्याने घरच्यांनी हाकलून दिले.   वयाच्या १५ व्या वर्षी घर सोडून मी पुण्याला आले. आणि इथेच पुण्यात एक खोली घेऊन राहायला लागले. काम शोधायला सुरूवात केले. पण लोकांनी ‘छक्यांना कसलं काम द्यायचं’ म्हणून हाकलून दिलं. त्यामुळे टाळी वाजवून उदरनिर्वाह करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.’’
 
घरच्यांचा पाठिंबा मिळाल्यास स्वत:ला सिध्द करू शकतात..
 घरच्यांकडून पाठिंबा मिळाल्यास तृतीयपंथीही व्यवसाय करू शकतात, उच्च शिक्षण घेऊ शकतात, याचे उदाहरण पुण्यातील २० वर्षीय मलिष्काने घालून दिले आहे. पाच वर्षांची असतानाच शरीरातील बदलामुळे मलिष्काला जाणवले की आपण कोणीतरी वेगळे आहोत. घरच्यांनाही ही गोष्ट समजली. पण आई, मोठी बहिण यांनी समजून घेतले. ‘तू जशी आहेस तशी राहा’ असे सांगितले. यामुळे मलिष्काची हिंमत वाढली. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न द्यायचा धिटपणा आला. पण तरीही घरात राहणे शक्य झाले नाही. वेगवेगळ्या ठिकाणी नोकºया करू लागली. दरम्यानच्या काळात कला शाखेच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेतले. ब्युटी पार्लरचा कोर्स करताना ती आता आॅर्डरही घेत आहे. उदरनिर्वाह होतोय पण शिक्षणाची इच्छा पूर्ण होत नाही.  हे सगळे असले तरी समाजाकडून मात्र मलिष्काला चांगल्या पध्दतीने स्वीकारले गेले नाही.  ती म्हणते, ‘‘मुले-मुली माझ्याशी मैत्री करताना घाबरतात. होस्टेलला  प्रवेश घेताना खूप समस्यांना सामोरे जावे लागले.  ज्या मुलांसोबत राहायचे ते माझ्याकडे वेगळ््या नजरेने पाहायचे. त्यामुळे मला असुरक्षित वाटायचे.’’
 
तृतीयपंथीयांना हवा निवारा 
तृतीयपंथीयांची सर्वात मोठी समस्य म्हणजे निवारा. कोणी घर भाड्याने द्यायला तयार होत नाही. शासनाकडून बाकी काही नाही पण निवाºयाचा प्रश्न सुटला तरी चालेल असे मलिष्का म्हणते. मतदानाचा अधिकार जरी आम्हाला भेटला असला तरी शासन आमच्यासाठी काहीच करत नाही.  रोजगार निर्माण होतील असे विविध कामे दिली पाहिजेत. एखादा व्यवसाय करण्यासाठी भांडवल उपलब्ध करुन दिले पाहिजे, असेही मलिष्का म्हणाली. 
श्रावणबाळ पेन्शनपासूनही वंचित
निराधारांसाठी असलेली श्रावणबाळ पेन्शन तृतीयपंथीयांना मिळू शकते. राजकीय कार्यकर्त्यांनी यासाठी आश्वासनेही दिली. त्यासाठी अर्जही भरले. पण सरकारी कार्यालयांच्या फेºया मारूनही पुढे काही झाले नाही, असे आप्पाने सांगितले.
 

 

Web Title: VIDEO: The clerk will not play; Let us work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.