अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे व्हिडीओ क्लिप फेटाळल्या
By Admin | Published: February 5, 2017 11:49 PM2017-02-05T23:49:56+5:302017-02-05T23:49:56+5:30
महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या व्हिडीओ क्लिपमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विकासकामांची माहिती दिली जात असल्याचे चित्रीकरण होते
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या व्हिडीओ क्लिपमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विकासकामांची माहिती दिली जात असल्याचे चित्रीकरण होते. मात्र प्रचारात शासकीय कर्मचाऱ्यांना सहभागी होता येत नसल्याने जाहिरात प्रसारण समितीकडून या व्हिडीओ क्लिपला मंजुरी नाकारण्यात आली आहे.
आतापर्यंत समितीकडे आलेल्या प्रचाराच्या ३१ व्हिडीओ क्लिपपैकी १५ व्हिडीओक्लिपना मंजुरी देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेच्या निवडणुकीसाठी सोशल मीडियावर प्रचार करावयाच्या तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यम, व्हॅनच्या आधारे प्रचार करायच्या व्हिडीओ क्लिप जाहिरात प्रसारण समितीकडून तपासून घेणे बंधनकारक आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे तसेच अपक्षांच्यावतीने ३१ व्हिडीओ क्लिप तपासणीसाठी समितीकडे पाठविण्यात आल्या होत्या.
त्यातील काही क्लिपमध्ये तांत्रिक चुका आढळून आल्या तर काही क्लिपमध्ये शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामध्ये योग्य त्या दुरुस्ती करून त्या पुन्हा समितीपुढे सादर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवार व विविध राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या ध्वनीचित्रफिती जाहिरात प्रसारण समितीद्वारे तपासणी करण्यात येतील. संबंधित इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांकडून आवश्यक दुरुस्त्या करून दिल्यास त्यांनाही त्वरित मान्यता दिली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.