संवेदनशील खटल्यांची सुनावणीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने
By admin | Published: October 23, 2015 01:55 AM2015-10-23T01:55:08+5:302015-10-23T01:55:08+5:30
संवेदनशील प्रकरणांमध्ये अटक झालेल्या आरोपींच्या केवळ कोठडीच्या मागणीवरील सुनावणीच नव्हे, तर खटल्यांची सुनावणीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी
- डिप्पी वंकाणी, मुंबई
संवेदनशील प्रकरणांमध्ये अटक झालेल्या आरोपींच्या केवळ कोठडीच्या मागणीवरील सुनावणीच नव्हे, तर खटल्यांची सुनावणीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी, अशी विनंती तुरुंगाधिकाऱ्यांनी आता केली आहे. तुरुंगाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातील कैद्यांना त्यांच्या दूर अंतरावर राहणाऱ्या नातेवाईकांना ‘व्हिड्यो’ हे वेबबेस्ड सॉफ्टवेअर वापरून, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भेटता येईल.
दहशतवादावरून अटकेत असलेल्या अबु जुंदाल, हिमायत बेग अशा आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर तुरुंगाधिकारी यशस्वीपणे शकले आहेत. २६/११ हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याचा अपिलाचा खटलाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच न्या. रंजना देसाई यांच्यापुढे चालला.
आता संवेदनशील खटल्यांचे कामकाजही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच चालवावे, अशी विनंती करणार आहोत. आता आम्ही २ एमबीपीएस ब्रॉड बँड कनेक्शन वापरत असून, ‘व्हिड्यो’ नावाचे वेबबेस्ड सॉफ्टवेअर (आयपी अॅड्रेस बेस्ड) विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरमुळे कोणताही अडथळा न येता कामकाज चालू शकेल, असे पोलीस महासंचालक (तुरुंग) बी. के. सिंह यांनी सांगितले. सिंग म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील न्यायालयांत आणि तुरुंगात मिळून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची जवळपास ३०० युनिटस आहेत.’
‘खटल्याच्या सुनावणीत आरोपीला न्यायालयात प्रत्यक्ष हजर न केल्यास बचाव पक्ष तुरुंगाधिकाऱ्यांकडून धाकदपटशाचा वापर झाल्याचा आक्षेप घेऊ शकतील,’ असे विचारता वरिष्ठ अधिकारी म्हणाला की,‘कोणत्याही प्रकरणात तुरुंगाच्या कर्मचाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे हितसंबंध नसतात आणि तशी काही शंका वाटल्यास वकील त्यांचे कनिष्ठ प्रतिनिधी प्रकरणाची सुनावणी चालेपर्यंत तुरुंगात पाठवू शकतात.’ तुरुंगाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा निर्णय अमलात आल्यास, दहशतवादाशी संबंधित प्रकरणांत आरोपींच्या सुरक्षिततेचा जो मोठा प्रश्न आहे, तो सुटू शकेल.
शिवाय गुन्हेगारी जगातील (अंडरवर्ल्ड) आरोपींना न्यायालयात नेईपर्यंतच्या मार्गावर त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडून सुरक्षेची जबाबदारी असलेले कर्मचारी पैसे घेण्याचे प्रकारही बंद होतील. पत्रकार जे. डे हत्या प्रकरणात अटक झालेल्या छोटा राजन टोळीतील सतीश कालिया याला हाजी अलीमध्ये त्याच्या बायकोला भेट घेऊ दिल्याबद्दल चार पोलीस कर्मचारी नुकतेच निलंबित झाले होते.
तुरुंगातील कैद्यांच्या खूप दूरवरील गावांमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांना तुरुंगात त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून संवादही साधता येईल. आमचे डाऊनलोड केलेले सॉफ्टवेअर ब्रॉडबँडचा वापर करून कॉम्प्युटरला जोडता येईल. यामुळे वेळ आणि खूप दूर अंतरावरून प्रवास करून येण्याचा खर्चही वाचेल, असे या सूत्रांनी सांगितले. मुंबईतील तीन आणि नागपूर, पुणे व औरंगाबादेतील प्रत्येकी एक रुग्णालय तुरुंगांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडलेले आहेत. आता सगळे निदान आणि उपचार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतात, असे हा अधिकारी म्हणाला.