Video: कोल्हापूरच्या अंबाबाईला घागरा चोळी नेसविल्या प्रकरणी पुजा-यावर गुन्हा
By Admin | Published: June 11, 2017 05:00 PM2017-06-11T17:00:43+5:302017-06-11T17:00:43+5:30
ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 11 - साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाईला पारंपरिक काठापदराच्या साडीऐवजी घागरा-चोळी नेसविण्यात ...
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 11 - साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाईला पारंपरिक काठापदराच्या साडीऐवजी घागरा-चोळी नेसविण्यात आल्याने कोल्हापूरकर आणि एकूणच भाविकांमधून तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आता पोलीस प्रशासनाने संबंधित पुजारी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या सह दोघांवर कलम २९५ अ (धार्मिक भावना दुखावने) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान शहरातील सर्व तालीम मंडळ व संस्था एकत्र येऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सदर पूजा बांधलेल्या पुजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागण्यांसाठी एकत्र येऊन जोरदार घोषणाही दिल्या. सोशल मीडियावरही हा विषय चांगलाच चर्चेत होता.
अंबाबाई मंदिराचा गाभारा पुजाऱ्यांच्या अधिकारात आहे. त्यामुळे ते गाभाऱ्यात करतील त्या सगळ्या गोष्टी योग्यच, असा अलिखित नियम आहे. शुक्रवारी असाच प्रकार झाला. श्री अंबाबाईला घागरा-चोळीचा पोषाख करण्यात आला. एका भाविकाने दिलेली ३५ हजारांची घागरा-चोळी आहे, असे सांगण्यात आले. देवीचा हा नव्या पोषाखातील फोटो व्हायरल झाल्यावर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
आदिशक्ती असलेल्या श्री अंबाबाईची काठापदराच्या साडीतील सालंकृत खडी पूजा ही मुख्य पूजा. सणवाराच्या औचित्त्याने त्यात बदल केले जात असले तरी साडी या मूळ पेहरावाला धक्का लावण्यात आला नव्हता. ही परंपरा मोडण्याचा अधिकार पुजाऱ्यांना कुणी दिला, अशा प्रकारचे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
अंबाबाईची साडी आणि खणा नारळाने ओटी भरणे हे नेहमीचेच. मात्र अंबाबाईला घागरा-चोळी वाहण्याचा हा बहुधा पहिलाच प्रकार असावा.
कायद्याचे व नियमांचे आणि देवीची बदनामी होणार नाही याचे भान जसे आम्ही ठेवतो, तसेच श्रीपूजकांनी परंपरांचे भान ठेवावे. अन्यथा भविष्यात या घटनांविरोधात कोल्हापूरकरांचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.
-संजय पवार, शिवसेना, कोल्हापूर जिल्हाप्रमुख
उद्या, रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान शहरातील सर्व तालीम मंडळ व संस्था एकत्र येऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सदर पूजा बांधलेल्या पुजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत. तसेच आंदोलनाची दिशा ठरविणार आहेत. हा प्रकार म्हणजे भक्तांच्या भावनांशी खेळ असून, त्याला आताच चाप लावला पाहिजे.
- दिलीप देसाई, प्रजासत्ताक सामाजिक संस्था
https://www.dailymotion.com/video/x8453b3