VIDEO- सांस्कृतिक सभागृह बनले सार्वजनिक शौचालय

By Admin | Published: December 27, 2016 06:42 PM2016-12-27T18:42:57+5:302016-12-27T18:42:57+5:30

ऑनलाइन लोकमत चंद्रपूर, दि. 27 - एकीकडे शासन गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी विशेष योजना राबवित आहे. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सावली ...

VIDEO-Cultural Hall became a public toilets | VIDEO- सांस्कृतिक सभागृह बनले सार्वजनिक शौचालय

VIDEO- सांस्कृतिक सभागृह बनले सार्वजनिक शौचालय

Next

ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 27 - एकीकडे शासन गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी विशेष योजना राबवित आहे. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सावली येथील चंद्रपूर-गडचिरोली या मुख्य मार्गावर असलेल्या सांस्कृतिक भवनाला सार्वजनिक शौचालयाचे रूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे शासनाच्या गाव हागणदारी मुक्त करण्याच्या योजनेचा बट्ट्याभोळ झाल्याचे दिसून येत आहे.
सावली येथे सन १९९९ साली माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या खासदार निधींतर्गत सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम नऊ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आले. गावातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सदर सभागृहाचे बांधकाम करण्यात आले होते. त्या माध्यमातून शासनाला राजस्वसुद्धा प्राप्त होणार होते. या सभागृहाला लागूनच दोन बाजूला दोन खोल्या, इलेक्ट्रिकची व्यवस्था, सिलिंग फॅन इत्यादी सोयी-सुविधा करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे या सांस्कृतिक भवनाला घरघर लागली आहे.
भवनाच्या एका बाजूला सार्वजनिक मूत्रीघर आहे. मागील बाजूस शेती आहे, तर बाजूला मोकळी जागा आहे. या परिसरात आजूबाजूला कुठेही कचराकुंडी नसल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो. बाजूला मोकळी जागा असल्याने अनेक जण तेथे शौचास जातात. सभागृहाचा वाली कुणी नसल्याने चोरट्यांनी सभागृहाचे दरवाजे तोडून येथील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू, सिलिंग फॅन लंपास केले. कालांतराने नागरिकांनी सभागृहातच जाऊन शौच करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदर सभागृहाला सार्वजनिक शौचालयाचे रूप आलेले आहे.
सदर सभागृहाची देखभाल पूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाकडे होती. त्यानंतर ते तहसील कार्यलयाकडे हस्तांतरीत करण्यात आले. तहसील कार्यालयाने स्पंदन या संस्थेला सभागृह हस्तांतरीत केले. स्पंदन या संस्थेतर्फे त्या सभागृहात व्यायामशाळा सुरू करण्यात येणार होती. मात्र त्यांना विरोध करण्यात आला. त्यामुळे पुन्हा त्यांची देखभाल तहसील कार्यालयाकडे आली. मात्र आजपर्यंतच्या एकही तहसीलदारांनी त्याकडे लक्ष दिले नाही. किंवा एकही पाहरेकरी नेमला नाही. त्यामुळे सदर सभागृह रामभरोसे आहे.

रुमाल बांधून मतदान
सदर सभागृहाची तात्पुरती साफसफाई करून लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र म्हणून निवड करण्यात येत होती. यावेळी मतदार तथा अधिकारी नाकावर रुमाल बांधून मतदान करीत होते. मात्र काही कालवधीनंतर ते मतदान केंद्रही रद्द करण्यात आले.

सभागृहातील साहित्य लंपास
सदर सभागृहामध्ये इलेक्टिक फिटिंग करून सिलिंग फॅन व विजेची सोय केली होती. या सभागृहामध्ये २० च्या जवळपास सिलिंग फॅन लावण्यात आले होते. मात्र या सभागृहाचा रखवाला कुणीही नसल्यामुळे चोरट्यांनी सभागृहातील सिलिंग फॅन व वीज बल्ब लंपास केले. यासंदर्भात तहसीलदार डी.एस. भोयर यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, आप तहसीलदारपदाचा नव्यानेच पदभार स्वीकारला आहे. यामुळे या संदर्भात पूर्ण माहिती जाणून घेऊ. त्या सभागृहाला संरक्षण भिंत नसल्यामुळे कोणीही सहज आत प्रवेश करू शकतो. त्यामुळे त्या सभागृहाला संरक्षण भिंतीच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले.

https://www.dailymotion.com/video/x844mlv

Web Title: VIDEO-Cultural Hall became a public toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.