VIDEO- पर्यटकांना त्र्यंबकेश्वरच्या निसर्गसौंदर्याची भुरळ

By Admin | Published: July 3, 2017 06:38 PM2017-07-03T18:38:36+5:302017-07-03T20:53:11+5:30

अझहर शेख/ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 3 - पावसाळा सुरू झाला की सहलींचे बेत आखले जातात. पावसाळी पर्यटनाची संधी जवळपास ...

VIDEO- The culture of Trimbakeshwar's natural beauty attracts tourists | VIDEO- पर्यटकांना त्र्यंबकेश्वरच्या निसर्गसौंदर्याची भुरळ

VIDEO- पर्यटकांना त्र्यंबकेश्वरच्या निसर्गसौंदर्याची भुरळ

Next

अझहर शेख/ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 3 - पावसाळा सुरू झाला की सहलींचे बेत आखले जातात. पावसाळी पर्यटनाची संधी जवळपास कोणीही दवडू देत नाही, कारण पावसाळ्यात बहरणारे निसर्गसौंदर्याची मोहिनी प्रत्येकालाच पडते. हिरव्यागार वसुंधरेच्या कुशीत वसलेल्या डोंगरांनाही हिरवा साज चढलेला असतो आणि ढग जणू त्यांच्या भेटीसाठी आतुर होऊन डोंगरांना आपल्या कवेत घेत असल्याचा भास होतो. पावसाच्या सरींमुळे हिरवाईने नटलेल्या डोंगरांवरून खळाळणाऱ्या धबधब्यांमुळे सौंदर्यात अधिकच भर पडते. आजूबाजूला वाहणारे ओहोळ, तलाव, नाले जोराचा थंडगार वारा आणि पावसाच्या कोसळणाऱ्या सरी अंगावर झेलत आल्हाददायक वातावरणात चिंब होण्याचा मोह निसर्गप्रेमी आवरू शकत नाहीत.

नाशिक जिल्ह्यातील कोकण म्हणून लोकप्रिय असलेले तसेच बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वरचा परिसर हरित सौंदर्याने नटलेला आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महराज यांचे समाधीस्थळ, त्र्यंबक राजाचे मंदिर भारतभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी कुंभमेळाही दर 12 वर्षांनी भरतो. यामुळे राज्यातून नव्हे तर परराज्यांमधूनही भाविक मोठ्या संख्येने बारामाही हजेरी लावत असतात. पावसाळ्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे. धार्मिक पर्यटनाबरोबरच पावसाळी पर्यटनाचाही आनंद नागरिक लुटताना दिसून येत आहे.

कुशावर्तच्या तलावासह गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताने पांघरलेला हिरवा शालू आणि तेथून दिसणारे निसर्गाचे विहंगम दृश्य कॅमेऱ्यात क्लिक करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. ब्रह्मगिरी परिसरातील निसर्गसौंदर्याचे चित्रीकरण मनाला मोहिनी घालणारे ठरते. नाशिक शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावरील या परिसरात पर्यटकांची सध्या लगबग पाहावयास मिळत आहे. त्र्यंबकेश्वरच्या वाटेतच पवनपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ मानल्या जाणाऱ्या अंजनेरी पर्वताच्या परिसरातील निसर्गसौंदर्य बघून पर्यटक वाटेत येथे थांबा घेतल्याशिवाय पुढे मार्गस्थ होत नाहीत. 
पहिने-पेगलवाडी गावांचा परिसर न्याहाळताना पर्यटकांच्या डोळ्यांची पारणे फिटत आहे. त्र्यंबक-घोटी रस्त्यावरील घाटातून मार्गस्थ होताना ही गावे लागतात. आजूबाजूला पसरलेल्या हरित सौंदर्यामध्ये गावातील टुमदार कौलारू घरे जणू एखाद्या चित्रकाराने कुंचल्यातून कॅनव्हासवर साकारलेले चित्रच भासते.

https://www.dailymotion.com/video/x8456zn

Web Title: VIDEO- The culture of Trimbakeshwar's natural beauty attracts tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.