VIDEO : शिक्षणातून घडणारी संस्कृतीच करेल देशाचे संरक्षण- राज्यपाल
By admin | Published: October 24, 2016 05:03 PM2016-10-24T17:03:49+5:302016-10-24T17:19:22+5:30
आज समाजात आणि देशात असुरक्षीततेची भावना व्यक्त होत आहे, गावाची आणि देशाची सुरक्षीतता संवेदनशील बनली आहे. अत्यंत प्रगल्भ सांस्कृतिक वारसा असलेला हा देश सतराव्या शतकापर्यंत जगाला मार्गदर्शक होता.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 24 - आज समाजात आणि देशात असुरक्षीततेची भावना व्यक्त होत आहे, गावाची आणि देशाची सुरक्षीतता संवेदनशील बनली आहे. अत्यंत प्रगल्भ सांस्कृतिक वारसा असलेला हा देश सतराव्या शतकापर्यंत जगाला मार्गदर्शक होता. संस्कृतीची हीच ताकद लक्षात घेता सैन्य, बॉम्ब किंवा सर्जिकल स्ट्राईकची गरज नाही, शिक्षणातून घडणारे संवेदनशील शांत मन आणि त्यातून उभी राहणारी संस्कृतीच गावाचे आणि देशाच्या संरक्षणाचे काम करू शकेल असे मत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.
नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची १५१ वी जयंती आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त गोखले एज्युकेशन सोसायटी व इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ एज्युकेशन फॉर वर्ल्ड पीस यासंस्थेच्या वतीने आयोजित सुशासन आणि शांततेसाठी शिक्षण या विषयाच्या परिषदेच्या उद्घाटनाप्रंसगी राज्यपाल बोलत होते. येथील एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष अरूण निगवेकर होते. तर व्यासपीठावर अणु उर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर, शिक्षण तज्ज्ञ तथा गोखले एज्युकेशन सोसायटीचे सरचिटणिस डॉ. मो. स. गोसावी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शिक्षण तज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी एक्सलन्स अवॉर्ड अणू उर्जा शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पालघर की इथोपीया? राज्यपालांचा सवाल-
पालघर येथील आदिवासी बालकांच्या कुपोषणाच्या विषयावर बोलताना राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी या ठिकाणी भूक आणि कुपोषणाने पडणारे बळी बघितल्यावर हे इथोपिया तर नाही ना असा प्रश्न पडत असल्याचे मत व्यक्त केले. सध्या पालघर येथील कुपोषीत बालकांची छायाचित्रे माध्यमात येत आहेत. भूकेने येथे अनेकांचे बळी जात आहेत, ही दुर्देवी बाब असल्याचे सांगून राज्यपालांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने डहाणू येथे राष्ट्रीय कौशल्य विद्यापीठ स्थापन केले जात आहे, त्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या कौशल्याधीष्ठीत शिक्षणक्रमांमुळेच आदिवासींसारख्या मागास समाजाच्या समस्या सुटतील असेही ते म्हणाले.