VIDEO : वसतीगृहातील ऋणी आणि पूजा अडकल्या रेशीम गाठीत
By Admin | Published: May 31, 2017 06:56 PM2017-05-31T18:56:04+5:302017-05-31T18:56:04+5:30
ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. ३१ - अधूनमधून कोसळणा-या हलक्या पावसाच्या सरी, सनई चौघडाचे सूर, व-हाडी मंडळींची लगबग, सोबतीला ...
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ३१ - अधूनमधून कोसळणा-या हलक्या पावसाच्या सरी, सनई चौघडाचे सूर, व-हाडी मंडळींची लगबग, सोबतीला वाद्यवृंद व सजलेले वधू-वर,संस्थेतील मुली व उपस्थित पाहुण्यांचा ओसांडून वाहणारा उत्साह अशा मंगलमयी वातावरणात बुधवारी तेजस्विनी महिला वसतीगृहातील ‘ऋणी’ आणि ‘पूजा ’ या दोन कन्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
कसबा बावडा येथील त्र्यंबोली मंगल कार्यालयात दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांच्या मुहूर्तावर झालेल्या विवाह सोहळ्यात संस्थेची कन्या पूजा हिचे पालकत्व स्विकारलेल्या विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील व त्यांच्या पत्नी रुपाली यांनी; तर दुसरी कन्या ऋणी हिचे कन्यादान जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहीते यांनी केले. उपस्थितांचे स्वागत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. डी. मोहिते व अधिक्षीका ज्योती पाटील यांनी केले.
वयाच्या पाचव्या वर्षी मातृछत्र हरपलेली व रेल्वे स्थानकात वडिलांची चुकामुक झालेली पूजा शर्माला पोलिसांच्यामार्फत नाशिक येथील बालगृहात दाखल केले. त्यानंतर सांगली येथील वेलणकर बालकाश्रमात दाखल केले. या संस्थेत तिने राहून १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीनंतर तिने प्रयोगशाळा तपासणीस (एमएलटी) चे प्रशिक्षणही पूर्ण केले. याशिवाय तिने ब्युटीपार्लर, रेडिओ जॉकी, कराटे, घरगुती उपकरण दुरुस्ती, रेक्झीन बॅग शिलाई आदीचे प्रशिक्षण घेतले. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती कोल्हापूरातील तेजस्विनी महिला वसतीगृहात दाखल झाली. पूजाच्या इच्छेनूसार तिला पॅथॉलॉजी लॅबमध्ये नोकरी मिळाली असून ती आता स्वत:च्या पायावर उभी राहीली. शासनाच्या माहेर योजनेचा लाभ संस्थेने पूजाला दिला. पूजाच्या इच्छेनुसार तिचा विवाह औरंगाबादमधील शकुंतला व श्रीराम भराडिया यांचा मुलगा रितेश यांच्याशी झाला. रितेश हे एका खासगी कंपनीत वरिष्ठ लेखाधिकारी आहेत. या विवाहामुळे पूजाला लहानपणी हरवलेले कुटूंबाचे छत्र भराडिया कुटूंबाच्या रुपाने पुन्हा एकदा मिळाले.
संस्थेची दुसरी कन्या ऋणी हिला जेव्हापासून कळते तेव्हापासून ती शासकीय वसतीगृहात राहत आहे. मिरज येथील संस्थेत ती लहानाची मोठी झाली. शिक्षणाची आवड नसल्याने ती घरकामात अधिक लक्ष घालू लागली. त्यामुळे घरकामातही तरबेज झाली. तिच्या इच्छेनुसार तिचा विवाह जयसिंगपूरमधील शोभा व नेमगोंडा पाटील यांचा मुलगा बाहुबली यांच्याशी झाला. बाहुबली हे तालुका खरेदी विक्री संघात नोकरी करत आहेत. ऋणीलाही पाटील कुटुंबीयांच्या रुपाने मायेची उब व कुटुंबाचे छत्र मिळाले.
या विवाह सोहळ्यास प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के, पोलीस निरीक्षक दिनकर चौगले, प्रविण चौगुले, शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक रिझवाना नदाफ,यांच्यासह विविध शासकीय कार्यालयाचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.