VIDEO: एकनाथ शिंदेंच्या हॉटेल रुममधला 'तो' संवाद व्हायरल, 'त्या' आमदाराला काढणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 08:40 AM2022-06-23T08:40:33+5:302022-06-23T08:43:12+5:30
शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसह आसाममधील गुवाहाटीस्थित रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबले आहेत. याठिकाणाहूनच शिंदे आपल्या भूमिका ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करत आहेत.
मुंबई-
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दुपारी साडेपाच वाजता राज्यातील जनतेला संबोधित केल्यानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास 'वर्षा' निवासस्थान सोडलं आणि 'मातोश्री'वर रवाना झाले. उद्धव ठाकरेंच्या भावनिक आवाहनानंतरही आज शिवसेनेचे आणखी सहा आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यातील तीन आमदार नुकतेच मोठ्या बंदोबस्तात गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिंदे गटात सामील झाले आहेत.
'ज्यांना जायचंय त्यांनी जा...'; उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आणखी ६ आमदार नॉट रिचेबल
शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसह आसाममधील गुवाहाटीस्थित रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबले आहेत. याठिकाणाहूनच शिंदे आपल्या भूमिका ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करत आहेत. त्यांच्या सोबतीला शिवसेनेचे इतरही आमदार आहेत. काल विधिमंडळातील प्रतोद म्हणून आमदार सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या पत्राला फेटाळत याच हॉटेलमधून एकनाथ शिंदे यांनी सुनील प्रभू आता शिवसेनेचे प्रतोद राहिलेले नसल्याचं जाहीर केलं होतं. बंडखोर आमदारांच्या सहीसह एक पत्रक जारी करत नवा प्रतोद म्हणून रायगडमधील महाडचे आमदार भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली.
फडणवीसही नॉट रिचेबल... पण मीडियासाठी, सागर बंगल्यावर ठरवताहेत रणनीती
भरत गोगावलेंचा प्रतोद पदासाठीचा फॉर्म भरतानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या टिमनं हा व्हिडिओ शूट केल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये आवाजही ऐकू येत आहे. यात ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक शिवसेनेचे प्रतोद म्हणून नियुक्त करण्यात आलेले भरत गोगावले यांच्याशी संवाद साधत आहेत. या संवादाचे आता अनेक अर्थही काढले जात आहेत.
व्हिडिओतील संवाद नेमका काय?
प्रताप सरनाईक- प्रतोदाचं काम काय हे माहित्येत ना? जबाबदारी वाढलीय आता तुमची. फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. शिवसेना पक्षाची जबाबदारी तुमच्यावर आहे. सर्व आमदारांना व्यवस्थित टिकवून ठेवा. त्यांना बोलायला द्या. मागच्या प्रतोदासारखं (सुनील प्रभू) करू नका...
प्रताप सरनाईक- ते मुंबईतील लोकांना जास्त बोलायला द्यायचे.
(इतक्यात रायगडमधील कर्जतचे आमदार महेंद्र थोरात तिथं येतात)
प्रताप सरनाईक- या...हे आता प्रतोद आहेत. कुणाला पक्षात ठेवायचं. कुणाला काढायचं...
महेंद्र थोरवे- तुम्ही ठरवा...
प्रताप सरनाईक- नाही, यांना (भरत गोगावले) अधिकार दिलेले आहेत. सुनील प्रभूपासून सुरुवात करणार आहेत.
VIDEO: शिवसेनेच्या प्रतोदपदी आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करतानाचा हॉटेल रेडिसन ब्लूमधील आमदारांचा संवाद समोर आला आहे, काय म्हणताहेत आमदार पाहा... pic.twitter.com/8TQAHnvCM7
— Lokmat (@lokmat) June 23, 2022
वरील संवाद सुरु असताना एकनाथ शिंदे, संजय शिरसाट, बच्चू कडू देखील तिथं उपस्थित असल्याचं दिसून येत आहे.
शिवसेनेचे आणखी ६ आमदार नॉट रिचेबल
शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार दीपक केसरकर, मंत्री दादा भुसे, आमदार संजय राठोड, दादरमधील आमदार सदा सरवणकर, कुर्ला विभागातील आमदार मंगेश कुडाळकर आणि चांदिवली विभागाचे आमदार दिलीप लांडे हे नॉट रिचेबल असून सूरतमार्गे गुवाहटीला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नागरिकांशी संवाद साधताना केलेल्या भाषणात बंडखोर आमदार आणि त्यांच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. शिवाय, एकनाथ शिंदे यांना समोरासमोर चर्चेला येण्याचे आवाहनही केले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानंतर लागोपाठ दोन ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सुनावले आहे.
गटनेता आणि प्रतोद नियुक्ती
३१ ऑक्टोबर २०१९ रोजी एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. एकनाथ शिंदे हेच पक्षाचे गटनेते असतील, असा ठराव संमत करण्यात आला. त्यासोबतच, पक्षाचे विधिमंडळ प्रतोद म्हणून आमदार भरत गोगावले यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांना तत्काळ प्रभावाने प्रतोद पदावरून हटविण्यात येत असल्याचेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.