VIDEO- आदिवासी विद्यार्थ्यांसोबत आगळीवेगळी दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2016 05:10 PM2016-10-28T17:10:33+5:302016-10-28T17:10:33+5:30
दरवर्षीप्रमाणे सोशल नेटवर्किग फोरमच्या वतीने गढईपाडा आणि खंबाळे या पेठ जवळच्या पाड्यांवर दिवाळी साजरी करण्यात आली.
ऑनलाइन लोकमत
पेठ (नाशिक), दि. 28 - दरवर्षीप्रमाणे सोशल नेटवर्किग फोरमच्या वतीने गढईपाडा आणि खंबाळे या पेठ जवळच्या पाड्यांवर दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी नवीन खेळणी, शैक्षणिक साहित्य, कपडे आणि फराळाचे पदार्थ मुलांना भेट देण्यात आले. गेली सहा वर्षे दिवाळीचा पहिला दिवा आदिवासी बांधवांच्या दारी लावल्यानंतर फोरमचे सदस्य आपल्या कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.
फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी फेसबुकवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी भेटवस्तू देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कराड (जि. सातारा) येथून सचिन पाटील यांनी अॅमेझॉनवरून काही खेळणी पाठवली. नाशिकचे डॉ. समीर पवार, डॉ. विशाल पवार, डॉ. सारिका देवरे यांनी वह्या, पुस्तकं, ड्रॉइंगबुक्स, कलरबॉक्स, स्केचपेन्स हे शैक्षणिक साहित्य भेट दिलं. दिनेश जोशी, प्रा. डॉ. आशिष चैरसिया, बाबाराव बिहाडे यांनी फराळाचे पदार्थही आणि मिठाई आणून दिली. याशिवाय अनेक फेसबुक मित्रांनी कपडे आणि खेळणी पाठवली.
हे सर्व साहित्य फोरमचे सदस्यांनी गढाईपाडा या गावातील विद्यार्थ्यांना भेट दिले. ही आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्यासाठी डॉ. पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव, बाबाराव बिहाडे, डॉ. उत्तमराव फरतळे, डॉ. बापू खालकर हे उपस्थित होते.