VIDEO - प्रतिभेच्या स्वप्नांना हवेत वास्तवाचे अग्निपंख! - चंद्रशेखर कुलकर्णी
By admin | Published: February 4, 2017 11:21 AM2017-02-04T11:21:01+5:302017-02-04T16:03:40+5:30
जळगाव येथे तिस-या विज्ञान साहित्य संमेलनाला आज सुरूवात झाली. त्यामध्ये लोकमतचे कार्यकारी संपादक (डिजिटल) चंद्रशेखर कुलकर्णी हे संमेलनाध्यक्षपद भूषवत असून त्यांच्या उद्घाटनाच्या भाषणाचा संपादित अंश.
Next
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ४ - जळगाव येथे आज व उद्य( 4 व 5 फेब्रुवारी) विज्ञान साहित्य संमेलन पार पडत आहे. त्यामध्ये संमेलनाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केलेल्या उद्घाटनाच्या भाषणाचा संपादित अंश.
मराठी विज्ञान परिषदेने, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहकार्याने आजपासून जळगाव मुक्कामी भरत असलेल्या विज्ञान लेखकांच्या अर्थात विज्ञान साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊन माझा असाधारण गौरव केला आहे. त्याबद्दल संयोजकांचा मी शतश: ऋणी आहे. आजवर हे पद भूषविलेल्या व्यक्ती स्वत: संशोधक होत्या वा विज्ञान लेखनाच्या प्रांतात मोलाची भर घालणार्य होत्या. माझी पदवीही विज्ञान शाखेची नाही. रूढार्थाने मी विज्ञान लेखकही नाही. कारकीर्दीचे म्हणायचे, तर माझी गेली तीस वर्षे पत्रकारितेत गेली. माझ्यासारख्याला हे अध्यक्षपद मिळण्याचा बादरायण संबंध लावायचाच तर तो इतकाच की विज्ञानविषयक लिखाणाविषयी माझ्या मनात अढी नाही. माध्यमातील माणूस म्हणून विज्ञान आणि समाज यांच्या परस्परसंबंधाविषयी माझ्या मनात आस्था आहे. कदाचित 'कुतूहल' हा माझा पेशा असल्याने त्याच पायावर बेतलेल्या विज्ञानाशी ही अशी नाळ जोडली गेली असावी, असे मी समजतो. ज्या पूर्वसूरींकडून अध्यक्षपदाची वस्त्रे माझ्याकडे आली, त्यांची गादी मी चालवू पाहणे हास्यास्पद ठरेल. पण 'आसनमहिमा मोठा असतो. विक्रमादित्याच्या सिंहासनावर बसलेल्या गुराख्याकडूनही तो योग्य न्याय करवितो' यावर श्रद्धा असलेल्या आपल्या संस्कृतीचे स्मरण करून ही जबाबदारी मी स्वीकारली आहे.
विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती आणि त्यातून साकारलेले आधुनिक जग हा मानवी संस्कृतीचा दैदिप्यमान पैलू आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाने गेल्या काही दशकात आपले जीवन पार बदलून टाकले आहे. त्यातूनच शब्दांच्या चकमकी आणि चमत्कृतींवर भर देण्याऐवजी आपण करीत असलेली विधाने शास्त्रीय प्रयोगांनी पडताळून पाहिली पाहिजेत, एकमेकांस वादात निरूत्तर करण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रयोग करून सत्याचा शोध घेणे जास्त इष्ट आहे, हा विचार रूजू लागला. माहितीच्या ढिगाचे रूपांतर ज्ञानात होण्याची प्रक्रिया गॅलिलिओच्या कर्तृत्वामुळे जगभरात सुरू झाली. माहितीचा व पूर्वानुभवाचा ढिगारा विज्ञानाचेच सख्खे भावंड असलेल्या गणिताच्या मुशीत घातल्यानंतर यंत्रशास्त्र विकसित झाले. ग्रहगणित सिद्ध झाले. निसर्गातील रहस्यांची उकल होऊ लागली. मॅक्सवेल आणि न्यूटन या दोन खांबांचा भक्कम आधार मिळाल्यावर आधुनिक विज्ञानाची वास्तू उभी राहिली. त्यापूर्वीच्या बाळबोध नोंदींना नेमकेपणाचे अर्थवाही आणि अचूकतेचे कोंदण मिळाले. इंग्रजी भाषेत गेल्या शे-दोनशे वर्षात झालेले विज्ञान लेखन हा त्याचाच परिपाक होता. याच काळात पारतंत्र्यामुळे आपल्याकडे या दालनाची कवाडे खुली झाली नाहीत. ही पूर्वपीठिका सांगण्याचे प्रयोजन इतकेच, की इंग्रजी भाषेच्या तुळनेत मराठीतील विज्ञान लेखनाची सुरूवात अंमळ उशिराने झाली. विज्ञान लेखनाच्या बाबतीत एक सनातन प्रश्न उपस्थित केला जातो. या प्रांतात मूळ विचार, सिद्धांत अथवा निष्कर्षाला जास्त महत्त्व द्यावयाचे, की भाषेच्या समृद्धीला अधिक महत्त्व द्यावयाचे? माझ्या मते या दोन घटकांचा परस्परसंबंध गरजेनुसार बदलतो. किंबहुना प्रयोजनाच्या निकषावर तसा तो बदलत राहिला पाहिजे. भाषा समृद्ध झाल्यामुळेच अमूर्त संकल्पनांना अचूक अर्थवाही कोंदण मिळू शकले. मग प्रश्न असा निमार्ण होतो, की अनुभवाचे, त्यातून मिळालेल्या माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेचे वाहन बनलेल्या विज्ञान लेखनाच्या बाबतीत कोणते चाक अधिक महत्त्वाचे? भाषेचे की तर्काच्या कठोर कसोटीवर सिद्ध झालेल्या वस्तुनिष्ठ सिद्धांताचे? या प्रश्नांची उकल करावयाची झाल्यास दृष्टिकोनाचा मुद्दा टाळून पुढे जाणे शक्य नाही. आपल्या म्हणजे मराठी आणि एकूणच भारतीय समाजाचा पिंड दुपेडी आहे. एकतर आध्यात्मिक नाहीतर भावनिक. म्हणजेच अभाव आहे, तो वैज्ञानिक दृष्टीचा आणि दृष्टिकोनाचा. कशाचा अभाव आहे, याचा नीट साक्षात्कार झाल्याखेरीज तो अभाव दूर करण्याचे प्रयत्न सुरू होऊ शकत नाहीत. वैज्ञानिक दृष्टीच्या बाबतीत तशी सामाजिक बैठक तयार व्हावी, यासाठी प्रयत्न झालेच नाहीत अशातला भाग नाही. तो प्रयत्न करणार्या व्यक्ती आणि संस्थांची मोजकी बेटे तयार झाली. पण त्याचे सार्वत्रिकीकरण झाले नाही. म्हणूनच सामान्यत: आपल्या समाजाची भाषा कथेकरी स्वरूपाची राहिली. सामान्य लोकव्यवहार पार पाडल्यास ती पुरेशी असते. पण तर्क व अनुभवाच्या सूक्ष्म-तरल छटा कार्यकारणभावाच्या अंगाने व्यक्त करण्यास ती तोकडी पडते. जनसामान्यांना केवळ कामचलाऊ भाषेकडून नवा विचार देण्याची क्षमता असलेल्या भाषेकडे घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी त्यामुळेच तर विज्ञान लेखकांवर येऊन पडली आहे. वैज्ञानिक वा संशोधक हे बिरूद लागू शकेल अशा मोजक्या प्रतिभासंपन्न व्यक्तींपुरते मर्यादित असलेले ज्ञान सामान्य विज्ञानाच्या रूपात जनसामान्यांपर्यंत नेण्याचे कामही विज्ञान लेखकांच्या वाट्याला आले आहे. ही विज्ञानाची नव्हे, तर अज्ञानाविरुद्धची लढाई आहे. बुवाबाजीद्वारे ज्या करामतीमधून अज्ञ समाजावर छाप पाडली जाते तेच प्रयोग वैज्ञानिकांनी करून दाखविल्यानंतरही बुवाबाजी नष्ट होईलच असे नाही. क्वचित प्रसंगी बुवाबाजीचे पितळ उघडे पाडण्यासाठी असे प्रयोग करून दाखविणार्या मंडळींनाही बुवाजा दर्जा बहाल केला जाऊ शकतो. विज्ञानातील प्रयोग आणि जादूचे खेळवजा चमत्कृती यातील महद्अंतर समजण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीचा पिंड जोपासला जाणे ही पूर्वअट बनते. अशा दृष्टिकोनाची जोपासना आपल्याकडे शास्त्रज्ञांकरवी होणे हे मुदलातच अवघड आहे. हस्तिदंती मनोर्यात बसून वैज्ञानिकांनी संशोधन करावे आणि वैज्ञानिक दृष्टीचा प्रचंड अभाव असलेल्या समाजाने आपल्या भावनिक-आध्यात्मिक पिंड जोपासत राहावे, अशा स्थितीतून विज्ञान आणि समाज यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे. ही दरी कमी करण्याचा वसा घेतलेले दूत म्हणजे विज्ञान लेखक. शतकानुशतके जमीन करणारा शेतकरी घटत्या उत्पादन फलांचा सिद्धांत मांडू शकत नाही. त्याला तो सुचू शकत नाही. म्हणूनच असा सिद्धांत मांडण्याची क्षमता असलेले आणि तो पचनी पडण्याइतपतही मानसिक बैठक नसलेले यांच्यातील दुवा म्हणून विज्ञान लेखकांच्या जबाबदारीत भर पडली आहे.
विज्ञान भावनांवर चालत नाही. श्रद्धा, सहिष्णुता, भाबडेपणा हे ज्याला वर्ज्य आहे, अशा विज्ञानाच्या बाबतीतील भूतकाळ वर्तमानकाळ आणि हे विज्ञान मानवी संस्कृतीला कोठवर नेणार आहे याचा भविष्यवेधी आडाखा जनसामान्यांच्या पुढ्यात मांडण्याचे काम विज्ञान लेखकांनी मराठीत सुरू केलेही आहे. अर्थात या स्वरूपाच्या लेखनाला प्रतिभेच्या स्वप्नांचे धुमारे फुटत असले तरी ही काही कविता नव्हे. वास्तवाचे भान ही या लेखनाची पूर्वअट ठरते. वस्तुस्थिती प्रतिभेची मागणी करते तेव्हा त्यातून विज्ञान लेखनाची कलाकृती साकारते. असिमॉव्ह, आथर्र क्लार्क यांनी हेच तर सिद्ध केले. आधी विज्ञान, मग शब्द या क्रमाला विज्ञान लेखनात महत्त्व असायला हवे. नुसत्या कल्पनेच्या भरार्या मारायच्या तर अॅलिस इन वंडरलॅण्ड सारखे लेखन विपुल करू शकणारे लेखक कमी नाहीत. ज्ञानलोकी देवपणाला थारा नाही, हे सत्य उमगलेला माणूसच विज्ञान लेखनाला हात घालण्यास पात्र ठरतो. शब्द ही विज्ञानाची धाकली पाती आहे, याचे भान आले की निव्वळ काल्पनिक आणि विज्ञान लेखन यातील सीमारेषा स्पष्ट दिसू लागते. कल्पनेची अफाट भरारी घेणारे रूपक आणि बावनकशी विज्ञान यांच्या प्रीतीसंगम झाला की त्यातून 'ज्युरासिक पार्क' सारखी कलाकृती जन्माला येते. विज्ञानाची म्हणून काही परिभाषा आहे. ती मराठीत आणणे काहीसे क्लिष्टही आहे. पण ते अशक्य वाटण्याइतपत मराठी दुर्बलही नाही. अगदी सावरकरांसारखा भाषाशुद्धीचा विचार समजा नाही केला, तरी 'वावडे' यासारख्या सोप्या शब्दप्रयोगांची मराठी विज्ञान लेखनाला अॅलर्जी असण्याचे कारण नाही! शब्दखेळ हा वास्तवापेक्षा प्रभावी असता नये, याचे भान असलेल्यांच्या हातून स्वाभाविकपणे कसदार विज्ञान लेखन झाले. या संदर्भात डॉ. जयंत नारळीकरांपासून डॉ. अनिल काकोडकरांपर्यंत आणि डॉ. बाळ फोंडके यांच्यापासून लक्ष्मण लोंढे यांच्यापर्यंत अनेक नावे घेता येतील. समर्थ विज्ञान लेखकांची संख्या आणखी काही पटीने वाढणे ही विज्ञान आणि समाज यांचे संबंध सशक्त होण्यासाठी गरजेचे आहे. आपल्याकडे इतर ग्रंथसंपदा अफाट असतानाही विज्ञान लेखन तितक्या विपुल प्रमाणात का झाले नाही, याचा विचार अशा संमेलनांमधून जरूर व्हायला हवा.
शब्दविज्ञान अर्थात विज्ञान लेखन अधिक सशक्त करण्याच्या कामी माध्यमांची भूमिका निदान आजवर स्पृहणीय राहिलेली नाही. हे चालणार नाही, अशा समजुतीतून विज्ञान लेखनाची अपेक्षा माध्यमांनी सातत्याने केली. प्रसार माध्यमांमध्ये काम करणार्या आमच्यासारख्या मंडळींचे विज्ञानासंबंधीचे अज्ञान अगाध आहे. ही मूठ झाकली ठेवण्याचे प्रयत्न आम्ही परोपरीने करीत आलो आहोत. मला आशा आहे, की ही स्थिती बदलेल. विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेली प्रगती, त्याचे समाजावर होऊ घातलेले परिणाम यांची चिकित्सा करणे हा खऱेतर माध्यमांच्या कर्तव्याचा भाग आहे. पण आम्हीही हे सारे लोकांना समजावून सांगण्याची क्षमता असलेल्या विज्ञान लेखकांना जागा आणि प्रतिष्ठा देत नाही. संस्कृती नदीच्या काठाने वसत गेली, असे म्हणतात. प्रसार माध्यमे ही माहितीची गंगा आहे. त्यातील अज्ञानाची घाण बाजूला करून विज्ञानाच्या प्रसाराला आणखी प्रवाही करण्याची संधी तुमच्यासारख्या विज्ञान लखकांनी सोडता कामा नये. प्रसार माध्यमांचे स्वरूपही विज्ञान-तंत्रज्ञानामुळेच बदलत आहे. या प्रवाही गंगेच्या तटीनिकटी विज्ञान लेखनाची संस्कृती वसली पाहिजे. शिवाय जोडीला आता सोशल मीडियाचा नवा आधार उपलब्ध झाला आहेच की! मराठी ग्रंथव्यवहाराच्या ज्ञात मयार्दा लक्षात घेता नव्या उर्मीनं विज्ञान लेखकांनी प्रसार माध्यमांचा प्रभावी वापर करून घेतला तरच मी या पद्धतीचे लिखाण वाचकाला वाचण्यास भाग पाडेन, हा वज्रनिश्चय फलद्रुप होईल. त्यासाठी विज्ञान लेखकांनाही संशोधकाच्या वृत्तीने तितकेच कष्ट घेऊन लेखन करावे लागेल. ज्ञान संपादनासाठी मातृभाषेसारखे साधन नाही. विज्ञान वैश्विक असले तरी आपले वाचक भारतीय आणि मराठी आहेत, याचे भान ठेवले की माध्यमांच्या गंगेत चांगल्या अर्थाने हात धुवून घेणे अवघड नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. विज्ञान लेखकांच्या भरीव कामगिरीमुळे आज ना उद्या आमच्या तथाकथित श्रद्धा नष्ट होणार असतील तर त्यासारखी इष्टापत्ती नाही. सुदैवाने महाराष्ट्रात समाज सुधारकांच्या कर्तृत्वाने वैज्ञानिक दृष्टि-कोनाची धुगधुगी विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच निर्माण झाली. ती ज्योत मनामनात जागविण्याची क्षमता असलेल्या प्रतिभावंतांच्या पुढ्यात बोलण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकवार संमेलनाच्या आयोजकांचे मी आभार मानतो. शिवाय विज्ञानाच्या तांत्रिक बाबींचे सुबोध विवेचन जनसामान्यांच्या हाती देण्याचा वसा न टाकता विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीवरील सामाजिक भाष्यालाही आपण सारे जागराचे स्वरूप द्याल अशी आशाही मी या संमेलनाच्या निमित्ताने व्यक्त करतो.
चंद्रशेखर कुलकर्णी लोकमतचे कार्यकारी संपादक (डिजिटल) आहेत. त्यांच्याविषयी त्यांच्याच शब्दांत...
मीही विज्ञान लेखनाविषयी उदासीन असलेल्या माध्यमांचाच प्रतिनिधी थोडासा वेगळा. वेगळा अशासाठी, की माझे वडील वि.गो. कुलकर्णी हे शास्त्रज्ञ. त्यांच्या पोटी जन्माला आल्याने माझ्यावर माझ्या बेतास बात मगदुराप्रमाणे विज्ञानाचा, वैज्ञानिक दृष्टीचा अनौपचारिक संस्कार झाला. वेळोवेळी होत राहिला. देशातील नामवंत वैज्ञानिकांना मला जवळून पाहण्याचे, भेटण्याचे, प्रसंगी बोलण्याचेही भाग्य लाभले. त्यातून कळत-नकळत निर्माण झालेल्या आस्थेतून माझ्या तीन दशकांच्या कारकीर्दीत विज्ञान लेखनाला थोडाबहुत हातभार लागला. विज्ञान हा आपला विषयच नसल्याचा उदासीन दृष्टिकोन निदान माझ्या भवताली तरी बदलण्याचा प्रयत्न मी करीत राहिलो. त्यातून किती बदल झाला, हे अचूक सांगणारी मोजपट्टी माझ्याकडे नाही पण माझ्या व्यक्तिगत समाधानात त्यातून निश्चितच भर पडली!