VIDEO- उपाचाराऐवजी मंत्रोपचारामुळे सर्पदंशाच्या रुग्णाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू
By admin | Published: September 9, 2016 09:28 PM2016-09-09T21:28:48+5:302016-09-09T23:49:21+5:30
सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
वरोरा, दि. ९ - सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच्यावर योग्य उपचार करण्याऐवजी दंश करणारा साप विषारी की, बिनविषारी आहे, याची शहानिशा रुग्णालयातील कर्मचा-याने करण्यासाठी त्या रुग्णास कडुलिंबाची पाने खाण्यास दिली.
यावेळी त्या कर्मचा-याने मंत्रोपचारही सुरु केले. ही प्रक्रिया करण्यात बराच वेळ जाऊन रुग्णाचा मृत्यू झाला. या मृत्यूला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिका-यासह संबंधित कर्मचारी दोषी असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करीत मृतकाचे आप्तेष्ठ व इतर नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने उपजिल्हा रुग्णालयात काही काळ तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती.
वरोरा तालुक्यातील चारगाव (खु.) येथील विनोद चिकटे यांच्या शेतात काम करुन घरी परत जाताना बालाजी रघुनाथ वाढई (६०) यांना ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सर्पदंश झाला. वाढई यांच्या पायाला सापाने दंश केल्याचे विनोद चिकटे यांना माहिती होताच त्यानी त्यांना तत्काळ वरोरा येथील उपजिल्हा रुणालयात दाखल केले.
उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत कर्मचारी व वैद्यकीय अधिका-यांनी सात विषारी की बिन विषारी, याची शहानिशा सुरू केली. या बाबतची माहिती सर्पदंश झालेल्या व्यक्तीस व नातेवाईकांना विचारु लागले. परंतु साप विषारी वा बिनविषारी, याची शहानिशा झाली नसल्याने रुग्णालयात दाखल करूनही वेळेवर उपचार सुरू झाले नाहीत. त्यातच रुग्णालयात कार्यरत कर्मचा-याने कडुलिंबाची पाने सर्पदंश झालेल्या व्यक्तीस खावयास दिले.
तसेच सर्पदंश झालेल्या पायावरुन हात फिरविणे सुरू केले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला. काही वेळानंतर वैद्यकीय अधिका-याने सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरू केले. त्यामध्ये अधिक वेळ वाया गेला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
रुग्ण मरण पावला असतानाही त्याला पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे दाखल करण्याचे कागदपत्र तयार करण्यात आले. रुग्णवाहीकेमध्ये नेण्याची तयारी सुरू असताना रुग्ण मृत पावल्याने संबंधितांनी चंद्रपूरला घेऊन जाण्यास नकार दिला.
तसेच संबंधितांवर कारवाई केल्याशिवाय शवविच्छेदन करू दिले जाणार नाही व शवविच्छेदनाकरिता बाहेरील तज्ज्ञ वैद्यकीय अधिका-यांची चमू बोलाविण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख नीलेश भालेराव, कामगार नेते मनोज दानव, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजू चिकटे, मनसे तालुका प्रमुख मनिष जेठाणी व मृतकाच्या आप्तेष्ठांनी रात्रीच लावून धरली.
त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात काही काळ तणाव सदृष्य स्थिती निर्माण झाली होती. रात्री व सकाळी उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होत. चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यजकीय अधिकारी डॉ. जी.एल. दुधे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. बिसेन शुक्रवारी सकाळीच वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृताच्या आप्तेष्टांना पार्थिव सोपविल्यानंतर तणाव निवळला.