VIDEO : नाशिकमध्ये यांत्रिकीकरणामुळे मुरमुरा व्यवसायावर संक्रात
By Admin | Published: August 9, 2016 09:42 AM2016-08-09T09:42:29+5:302016-08-09T10:17:18+5:30
घोटी शहरासह इगतपुरी तालुक्यातही मुरमुरा भट्टयांनी बदलत्या काळात या व्यावसायाचेही यांत्रिकीकरण झाल्याने हा व्यवसाय संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
सुनील शिंदे
ऑनलाइन लोकमत
घोटी(नाशिक), दि. ९ - घोटी शहरासह इगतपुरी तालुक्यातही मुरमुरा भट्टयांनी बदलत्या काळात या व्यावसायाचेही यांत्रिकीकरण झाल्याने हा व्यवसाय संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले इतर उद्योगही बंद होण्याच्या मार्गावर आहे.भातावर प्रक्रिया करून तांदूळ निर्मितीसाठी भात मिला उभ्या राहिल्या आणि भाताच्या गिरणीची घरघर बंद झाली.तसेच यांत्रिकीकरणा मुळे मध्यरात्री सुरु होऊन सकाळी संपणारा हा कायमचा संपण्याच्या मार्गावर आहे.यामुळे मुरमुरा निर्मिती करून उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
पावसाचे माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात पन्नास वर्षापूर्वी प्रचंड आणि मुसळधार पाऊस होत असल्याने,तसेच तालुक्याचे वातावरण भात पिकाला पोषक असल्याने भाताचे विक्रमी उत्पादन होत असे.केवळ सेंद्रीय खताचा वापर होत असल्याने या भाताला सर्वत्र जोरदार मागणी होत होती.यातच भाताचे गरि कोळपी हे वाण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तांदळाला प्रचंड मागणी असल्याने घोटी बाजारपेठ याच तांदळासाठी प्रसिद्ध झाली.आणि यामुळे भाताचे सर्वत्र प्रचंड उत्पादन होऊ लागले.या भातावर प्रक्रिया करणारे अनेक लघु उद्योग त्याच काळात घोटी शहरात उभे राहिले.भातापासून तांदूळ निर्मिती व भातापासून मुरमुरा निर्मिती अशा दोन प्रमुख व्यवसायाने मात्र घोटी शहराला नावलौकिक मिळवून दिला. एकट्या घोटी शहरात त्यावेळी मुरमुरा निर्मिती करणाऱ्या शेकडो भट्ट्या उभ्या राहिल्या.या भट्ट्यानी अनेक जणांना रोजगार,तर अनेकांना मान,सन्मान,व प्रतिष्टा मिळवून दिली.या उद्योगांनी हजारो जणांना रोजगार उपलब्ध करून दिला. हळू हळू तालुक्यात धरणाची निर्मिती होऊ लागली.यामुळे शेतकऱ्यांनी भात उत्पादनाला दुय्यम स्थान देत बागायती,व संकरित भाताच्या बियाणाला अधिक प्राधान्य देत,कमी वेळेत,कमी भांडवलात जास्त उत्पादन देणाऱ्या बियाणाच्या लागवडीकडे अधिक कल दिल्याने भाताच्या उत्पादनात कमालीची घट झाली.परिणामी यावर अवलंबून असणारे अनेक लघु उद्योग धोक्यात आले.हा उद्योग धोक्यात येण्याची अनेक कारणे आहेत.मुरमुरा निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत तसेच मजुरीत वाढ झाल्याने हा खर्च व मिळणारा नफा यात प्रचंड तफावत निर्माण झाल्याने अनेकांनी हा व्यवसाय बंद केला आहे. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या मजुरावर,व इतर घटकावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.तरीही परिस्थितीवर मात करीत व मुरमुरा व्यवसायाच्या यांत्रिकीकरणाशी स्पर्धा करीत अनेकांनी हा व्यवसाय अद्यापही शाबूत ठेवला आहे.
पारंपारिक मुरमुरा भट्टीत एक पोते भातापासून साधारणता आठ पोते मुरमुरा निर्माण होते.यातून भात खरेदी,मजुरी,मेहनत व इतर खर्च वगळता मालकाच्या हातात अत्यल्प नफा मिळत असतानाही या व्यवसायाचे अस्तित्व जतन करण्यासाठी घोटीतील भट्टी मालकाची केविलवाणी धडपड चालू आहे. भांडवलदाराच्या लहान उद्योगासाठीही शासन व वित्तीय संस्था आर्थिक पाठबळ देऊन व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी सहकार्य करते परंतु गेली पन्नास वर्षापासून पारंपारिक असलेल्या या व्यवसायाची ना शासनाने दाखल घेतली ना वित्तीय संस्थांनी. शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा व्यवसाय इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.
अशी होते मुरमुरा निर्मिती :-
मुरमु-यासाठी आवश्यक असणाऱ्या भाताला सर्वप्रथम पाण्याच्या हौदात भिजत घातले जाते.पूर्णपणे भात भिजल्यानंतर या हौदातील पाणी काढून भात पूर्णपणे सुकविले जाते. तसेच हे भात गरम उकळत्या पाण्यात टाकून काढले जाते. हे भात सुकल्यानंतर गिरणीतून त्याचे तांदूळ काढले जातात.या तांदळाला एक कामगार मिठाचे पाणी लावून दुसऱ्या कामगाराकडे देतो. हा कामगार हे तांदूळ गरम कढईत मिठ व तांदूळ एकजीव करण्यासाठी गरम करतो.एकजीव केलेले तांदूळ या भट्टीचा मुख्य कारागीर समुद्राच्या गरम रेतीत टाकतो. आणि याच ठिकाणी तांदळापासून मुरमुरा तयार होतो. हा मुरमुरा चाळून बारदानाच्या अथवा प्लास्टिकच्या पोत्यात भरला जातो.