VIDEO - अंधश्रद्धा संपता संपेना, तुम्हीच बघा!
By admin | Published: September 20, 2016 05:11 PM2016-09-20T17:11:41+5:302016-09-20T17:30:40+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सातत्याने प्रात्यक्षिक करून जनजागृती करतात. परंतु त्याचा बोध घेतला जात नसल्याचे मंगळवारी दुपारी लोकमतने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान दिसून आले.
Next
95 टक्के वाहनधारक घाबरले ‘ओलांड्या’ला!
नितीन गव्हाळे, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 20 - माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माणूस प्रगत झाला आहे. परंतु विचार प्रगत झालेले नाहीत. सुशिक्षित समाजमनावर अंधश्रद्धेचा पगडा प्रचंड आहे. भूत, भानामती, जादुटोणा, मंत्रतंत्राविषयी समाजामध्ये असलेली भिती जराही कमी झालेली नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सातत्याने प्रात्यक्षिक करून जनजागृती करतात. परंतु त्याचा बोध घेतला जात नसल्याचे मंगळवारी दुपारी लोकमतने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान दिसून आले. लोकमत चमूने एका पत्रावळीमध्ये लिंबू, मिरची, कुंकवाने मढवलेला कणकेचा गोळा, दिवा, हळद, कुंकू आणि गुलाल असे साहित्य ज्याला ‘ओलांडा ’ म्हणून संबोधले जाते हे सर्व साहित्य रस्त्याच्या मधोमध ठेवून सर्वेक्षण केले. सर्वेक्षणादरम्यान एक तासामध्ये १३७ दुचाकी, ८ चारचाकी वाहने व २३ पादचारी गेलेत. यातील ९५ टक्के लोकांनी कथित पूजा साहित्यावरून जाण्याचे टाळले. यावरून समाजमनामध्ये अंधश्रद्धेबाबत प्रचंड भिती असल्याचे दिसून आले.
२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिन म्हणून पाळल्या जातो. समाजामध्ये जादुटोणा, तंत्रमंत्र, अघोरी विद्या या थोतांड असणाºया अंधश्रद्धेविषयी शासनानेही कायदा केलेला आहे. अंधश्रद्धा बाळगू नका. अशी सातत्याने जनजागृती केली जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय शाळांमध्ये जावून जादूटोणा, बुवाबाजी, भानामती कसे थोतांड आहे. याबाबत नागरिकांना जागरूक करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. परंतु वैज्ञानिक युगामध्येही उच्चशिक्षित, सुशिक्षित नागरिक अंधश्रद्धेच्या पगड्यातून बाहेर पडायला तयार होत नाहीत. एवढी प्रचंड भिती त्यांच्या मनामध्ये बुवाबाजी, जादुटोणाचे थोतांड मिरवणाºया तथाकथीत धुरीणांनी निर्माण करून ठेवली आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन दिनानिमित्त लोकमतने सर्वेक्षण केले. लोकमत चमूने एका पत्रावळीत हे साहित्य रस्त्यावर ठेवले आणि नागरिकांमध्ये अंधश्रद्धा किती ठासून भरली आहे. याची पाहणी केली. पाहणीदरम्यान ९५ टक्के वाहनचालकांनी रस्त्याच्या मधोमध ठेवलेले साहित्य, लिंबू, मिरची ओलांडण्याची हिंमतच केली नाही. उलट अनेकांनी हे साहित्य पाहून वाहने दुसºया बाजूने वळून घेतल्याचे दिसून आले.
पोलीस दादा तुम्ही सुद्धा?
अंधश्रद्धा निर्मुलनामध्ये पोलिसांची भुमिका महत्वाची आहे. पोलीसही समाजमनातील भिती घालविण्यासाठी कार्य करतात. कोणी तथाकथित महाराज बुवाबाजी, भानामती, जादूटोणा करीत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटकाव करतात. असे असतानाही पोलीससुद्धा मनामध्ये अंधश्रद्धा बाळगत असतील तर काय बोलावे. रस्त्यावरील हे साहित्य पाहून पोलीस व्हॅनसह अनेक पोलीस दादांनी त्यावरून जाण्याचे टाळले.