VIDEO- दोन वर्षांत सर्व गरिबांना हक्काची घरे देणार- मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2017 04:47 PM2017-02-09T16:47:05+5:302017-02-09T16:47:05+5:30
ऑनलाइन लोकमत जळगाव, दि. 9 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घर देण्याचे स्वप्न पाहिले ...
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 9 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घर देण्याचे स्वप्न पाहिले आहे. मात्र राज्य शासन २०१९ पर्यंत सर्व गरिबांना हक्काची घरे देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हसावद (ता.जळगाव) येथील प्रचार सभेत सांगितले. यावेळी त्यांनी शासनाकडून, शिक्षण, रोजगार, कृषी यासह विविध क्षेत्रासाठी राबविलेल्या योजनांचा लेखाजोखा सादर केला.
जळगाव जिल्ह्यातील म्हसावद-बोरनार गटातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जि.प.अध्यक्षा प्रयाग कोळी, खासदार ए. टी. पाटील यांच्यासह आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू असलेल्या टीकेला मुख्यमंत्री जळगावच्या सभेत उत्तर देतील तसेच सेनेच्या मंत्र्यांनी बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर घेतलेल्या भेटीबाबत ते बोलतील अशी अपेक्षा होती मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात चकार शब्दही काढला नाही. ते म्हणाले, सध्या मी किती पाणी पितो याकडे अनेकांचे लक्ष असते. मी त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत विरोधकांना टोला हाणला.
७० वर्षानंतरही मुलभूत समस्या कायम
मुख्यमंत्री म्हणाले, संपूर्ण राज्यात फिरत असताना ७० वर्षानंतरही अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत समस्या ग्रामीण भागात कायम आहे. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना वीज मिळाली नाही. त्यामुळे शेतात पाणी असून देखील पिकांना पाणी देता आले नाही.
शेतकऱ्यांना ८ हजार कोटींची थेट मदत
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले आम्हाला विचारतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी काय केले? आम्ही दोन वर्षांपूर्वी सत्तेत आलो मात्र तुमच्या ५० वर्षातील नाकर्तेपणामुळे आज शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे. आम्ही शेतकऱ्यांना ८ हजार कोटी रुपयांची थेट मदत दिली.
जलयुक्त शिवारमुळे ४ हजार गावे दुष्काळमुक्त
राज्यातील २० हजार गावांमध्ये मानवनिर्मित दुष्काळीस्थितीत आहेत. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही जलयुक्त शिवार योजना आणली. पावसाचे पाणी आपल्याच गावात अडविण्यावर आम्ही भर दिल्याने आतापर्यंत ४ हजार गावे
दुष्काळमुक्त झाली आहे. या पावसाळ्यानंतर ११ हजार गावांमधील दुष्काळ संपणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१२ लाख हेक्टरवर संरक्षित सिंचन क्षेत्र
आघाडी शासनाने कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही दुष्काळीस्थिती कायम राहिली. दुष्काळमुक्तीसाठी आम्ही ३ हजार कोटी तर ५०० कोटींची रक्कम ही लोकसहभागातून उभी केल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अंतर्गत पाणी अडविल्यामुळे आज १२ लाख हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र तयार करण्यात आम्हाला यश आले.