VIDEO : बैलांच्या शर्यत बंदीविरोधात चाकणमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार

By Admin | Published: January 21, 2017 06:54 PM2017-01-21T18:54:12+5:302017-01-21T21:12:08+5:30

ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 21 -बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवा अन्यथा पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचे हत्यार उगारले जाईल, असा ...

VIDEO: Farmers' Elgar in Chakan against bullock race ban | VIDEO : बैलांच्या शर्यत बंदीविरोधात चाकणमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार

VIDEO : बैलांच्या शर्यत बंदीविरोधात चाकणमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 21 -बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवा अन्यथा पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचे हत्यार उगारले जाईल, असा इशारा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला. बैलगाडा शर्यतीवरील बंदीच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांसह बैलगाडा मालक, अखिल भारतीय बैलगाडा संघटना, गाडा शौकीन व हजारो शेतकऱ्यांनी आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे-नासिक महामार्गावर घोडी व बैल सोडून तब्बल अर्धा तास महामार्ग रोखला. त्यामुळे महामार्गावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती.
 
'संस्कृती टिकवा, पेटा हटवा,' 'बैल वाचवा, शेतकरी वाचवा,' पेटा हटवा, बैल वाचावा', अशा आशयाचे व जाहीर निषेधाचे फलक हातात घेऊन 'बैल आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा', 'कायद्यात बदल झालाच पाहिजे,' अशा जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांनी व बैलगाडा शौकिनांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यात्रा-जत्रांचा मोसम सगळीकडे सुरू झाल्याने बैलगाडा शर्यत बंदी हटवण्यासाठी प्राणिमित्र संघटनेच्या विरोधात चाकण येथे शेतकरी व बैलगाडा मालकांनी मोठे आंदोलन करून पुणे - नाशिक महामार्ग अडवून शर्यती त्वरित सुरू करावी, असे निवेदन तहसिलदारांकडे दिले. बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटविण्यात यासाठी संपूर्ण राज्यात मोठे आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे यावेळी बैलगाडा मालक चालक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
 
यावेळी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खेडचे आमदार सुरेश गोरे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, "काही संघटना, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश प्रशासन व आम्ही सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आवाहन करीत होतो. लोकसभेतही तीन वेळा बैलगाडा बंदी संदर्भातील मागणी उठवावी आणि बैलांचा समावेश विशेष यादीतून वगळावा यासाठी प्रयत्न केला. पर्यावरण मंत्र्यांना बैलगाडा मालकांसह भेटून निवेदने दिली. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या खासदारांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटलो. वटहुकूम पास करण्याची जी मागणी आज होत आहे, ती अडीच वर्षांपूर्वी लोकसभेत केली होती." ते म्हणाले, प्रकाश जावडेकर यांनी वटहुकूम काढण्याऐवजी एक नोटिफिकेशन काढले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला, निर्णयाला एखाद्या मंत्र्यांचे नोटिफिकेशन हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापेक्षा मोठे होऊ शकत नाही. म्हणून त्यास ७ जानेवारी २०१६ रोजी आव्हान देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळले. कायदा करायचा असेल तर तो लोकसभेत करावा असे कोर्टाने सांगितले. त्याला कायदेविभागाची मंजुरी मिळाली असून कॅबिनेट मध्ये मंजुरी घेऊन लोकसभेत बिल प्रस्तुत होऊन त्याच्यावर चर्चा शिवून मंजूर करून घेणे हा पर्याय आहे.
 
ते पुढे म्हणाले, "तामिळनाडू राज्यात जो आक्रोश आहे तो जनशक्तीचा आहे, तेथील आंदोलनाला श्री श्री रविशंकर, अभिनेते रजनीकांत, कमल हसन, ए.ए. रेहमान हे सर्व या आंदोलनात उतरून पाठिंबा देतात, मग महाराष्ट्रात काय चाललंय? आपले नेते व अभिनेते का नाही आंदोलनाच्या पाठीशी ? आता शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेस जिंदाबाद नाही, कोणत्याही पक्षाचा आवाज काढायचा नाही, तर सगळ्यांनी एकत्र या, राजकारण बाजूला ठेवा, आणि सुप्रीम कोर्टात राजकारण विरहित लढा द्या. तरच सरकारला जाग येईल."
 
पेटावाल्यांचा विरोध का?
आढळराव पुढे म्हणाले, पेटावाल्यांना या कामासाठी परदेशातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो, आणि ते त्यांना दाखवावे लागते. पेटावाले घोड्याच्या शर्यती बंद करू शकत नाहीत, ऊस वाहतुकीच्या गाडीची मर्यादा ७५० किलो असताना अडीच ते तीन टन वाहतूक करताना पेटवाल्यांना दिसत नाही का?  खोटी छायाचित्रे सुप्रीम कोर्टाला सादर करून आतापर्यंत बैलगाडा मालकांवर अन्याय केला.
 
ते म्हणाले,"राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. बैलगाडा शर्यतीबंद असल्यामुळे कित्येक पिढ्यांपासून चालू असलेल्या बैलगाडा शर्यतीतील बैलांचा अमानुष छळ केला जातो, असं कारण न्यायालयात दाखवत या शर्यती प्राणिमित्र सघंटनेनी बंद करण्यात याव्यात, अशी याचिका दाखल केल्यावर राज्य सरकारने कुठलेही हालचाल न केल्याने न्यायालयाने या शर्यतीवर पूर्ण बंदी आणली. त्यामुळे गेल्या दोन  वर्षापासून या बैलगाडा शर्यती बंद झाल्या आहेत."
 
आमदार सुरेश गोरे बोलताना म्हणाले की, "खेड तालुक्याला आंदोलनाची परंपरा आहे असून शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी चाकण येथे पहिले आंदोलन करून आंदोलनाची सुरुवात केली. राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय जोडे बाहेर काढून बैलगाड्यांच्या आंदोलनासाठी एकत्र आलोय. यासाठी कुणीही राजकारण करू नये. असे प्रतिपादन आमदार सुरेश गोरे यांनी केले."
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, "गोवंश हत्या बंदीने काय साधले? भाकड जनावरे बेवारस सोडून देताना ती अन्न, अन्न करून मारतात, तेव्हा कुठे जातात प्राणीमित्र. त्याचे पाप माथ्यावर? सरकार बदलले म्हणून आत्महत्या थांबल्यात का? असा सवाल करून आज शर्यतीच्या बैलांवर बंदी केली, उद्या औताला व बैलगाडीला जपायला बंदी केली, तर काय करायचे? एक महिन्यात बैलगाडा चालू करतो म्हणणाऱ्यांनी त्वरित राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली. यावर आमदार सुरेश गोरे यांनी बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी सर्व पाक्षीय लोक एकत्र आले असताना त्यात कुणी राजकारण आणू नये, असे सांगितले.
 
 
 
तामिळनाडू मधील जलिकट्टूला लवकर हिरवा कंदील मिळून त्या स्पर्धा सुरू होतील, महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे येत्या दोन दिवसांत पाठपुरावा करून बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा, असे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ टाकळकर यांनी सांगितले. प्राणिमित्र संघटनेच्या कुठल्याही सदस्यांना बैलांच्या संगोपनाची माहिती नाही, विनाकारण स्वतःच्या हव्यासापोटी शेतकर्‍यांच्या आवडत्या खेळाला विरोध केला आहे. कुठल्याही प्रकारची संपूर्ण माहिती नाही घेता ही प्राणिमित्र सघंटना काम करत आहे. येत्या काही दिवसांत आंदोलन मोठ्या प्रमाणावर उभे करणार असेही ते म्हणाले. 
 
 
एक्स्प्रेस हायवेवर रास्ता रोको
रविवारी सकाळी दहा वाजता मुंबई येथील आझाद मैदानावर व सातारा जिल्ह्यातील कराड येथे तर मंगळवारी २४ तारखेला मावळ तालुक्यात आंदोलन करून पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे अडविण्यात येणार आहे.
 
 

https://www.dailymotion.com/video/x844p1a

Web Title: VIDEO: Farmers' Elgar in Chakan against bullock race ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.