VIDEO: औरंगाबादमध्ये अग्नितांडव, फटाक्यांचे 200 स्टॉल्स जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2016 12:09 PM2016-10-29T12:09:09+5:302016-10-29T15:01:58+5:30
जिल्हा परिषदेच्या मैदानात फटाक्यांच्या स्टॉल्सना लागलेल्या भीषण आगीत तब्बल 200 स्टॉल्स आणि वाहने जळून खाक झाली आहेत
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 29 - जिल्हा परिषदेच्या मैदानात फटाक्यांच्या स्टॉल्सना भीषण आग लागली होती. या मैदानात असणारे जवळपास 200 फटाक्यांचे स्टॉल्स आगीत जळून खाक झाले आहेत. एकमेकांना लागून फटाक्यांचे स्टॉल्स असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली. आगीमध्ये 20 ते 25 दुचाकी आणि अनेक चारचाकी वाहनेदेखील जळून भस्मसात झाली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीमुळे कोट्यवधीचं नुकसान झालं आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे.
गंभीर बाब म्हणजे निवासी परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याची माहिती अजूनही अस्पष्ट आहे. मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी स्थानिकांसह फायर ब्रिगेडदेखील शर्थीचे प्रयत्न करत होते. आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या, पोलिसांचे पथक आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली होती.
आगीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई देणार असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं आहे. दरवर्षी या मैदानावर फटाक्यांचं मार्केट भरलेलं असत. मात्र ही आग पाहता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणती उपाययोजना केली नव्हती का ? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. आग लागली असल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेण्यास सुरुवात केली असल्याने गर्दी होऊ लागली होती. पोलिसांनी औरंगाबादकरांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं.