व्हिडीओ - मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यात पूरस्थिती
By Admin | Published: August 2, 2016 09:24 AM2016-08-02T09:24:20+5:302016-08-02T10:02:33+5:30
नाशिक जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठा करणारी धरणे दुथडी भरुन वाहत असली तरी, यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २ - नाशिक जिल्ह्यामध्ये रात्रभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी धरणे दुथडी भरुन वाहत असली तरी, यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विर्सग सुरु असल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, रामसेतू आणि दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेले आहे.
नाशिक गंगापूर धरणातून 12 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने रामकुंड परिसर पुराच्या पाण्याखाली गेला आहे. राज्यातून आलेल्या अनेक नागरिकांना रामकुंडा ऐवजी मालवीय चौकात दशक्रिया विधी करावा लागला आहे.
परिसरातील भांडी बाजारातही पुराचे पाणी शिरले आहे. गोदावरी नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आले आहे.
दिंडोरी
दिंडोरी तालुक्यात रेकॉर्डब्रेक मुसळधार पाऊस झाला असून सर्व नदी नाल्यांना महापूर आला आहे. अनेक रस्त्यावरील पूल फरशी पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. पालखेड धरणमधून 15841 क्युसेस पाणी सोडले असून अजून पाणी सोडावे लागणार आहे.कादवा नदीकाठच्या तसेच सर्व नदी नाले काठच्या जनतेने सावधानता बाळगावी. पूल फरचीवरून पाणी वाहत असल्यास वाहने नेऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नाशिक कळवण रस्त्यावर रणतले येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाले आहे
दिंडोरी तालुका पर्जन्यमान
दिंडोरी - 142.0 mm
मोहाडी - 80.0 mm
वणी - 80.0 mm
उमराळे - 136.0 mm
कोशिंबे - 92.0 mm
ननाशी - 82.0 mm
वरखेडा - 85.0 mm